
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जैन धर्माच्या धार्मिक अनुष्ठान कार्यक्रमातून एक कोटी रुपयांचा सोन्याचा कलश चोरीला गेला आहे. 760 ग्रॅम सोन्यापासून बनवण्यात आलेला आणि 150 ग्रॅमचे हिरे जडवलेला तसेच माणिक व पाचूने सजवलेला हा कलश आहे.
जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रम 9 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमात धार्मिक विधीसाठी कलशाचा वापर केला जात होता. उद्योगपती सुधीर जैन यांनी तो दिला होता. गेल्या मंगळवारी कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही पोहोचले होते. स्वागताच्या गोंधळादरम्यान मंजावरून कलश गायब झाला.
चोराची ओळख पटली
पोलिसांनी कलश चोरी केलेल्या संशयित व्यक्तीची ओळख पटवली आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी व आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱयांद्वारे चित्रीत करण्यात आलेलं फुटेज तपासलं, ज्यामध्ये आरोपी दिसत आहे. आरोपी जैन साधूंच्या वेशात वावरत असल्याचे आणि तो मंचावरून एक काळ्या रंगाची बॅग उचलताना दिसत आहे. ही व्यक्ती बऱयाच दिवसांपासून धोती-कुर्ता घालून अनुष्ठान स्थळाच्या जवळपास फिरत होती. याने इथल्या लोकांसोबत ओळख वाढवली होती. त्यामुळे कोणालाच त्याच्यावर संशय आला नाही. आरोपीच्या मागावर दिल्ली पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. चोराच्या सुरुवातीपासूनच्या संशयास्पद हालचाली वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱयांमध्ये कैद झाल्या आहेत.