
कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात काळविटाची शिकार करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या म्होरक्याला वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून शिकारीचे जाळे, कोयता, दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर सुरेश काळे (रा. कुळधरण, ता. कर्जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्याच्या कार्यक्षेत्रांमधील गट नंबर 161 ड या परिसरामध्ये काही शिकाऱयांनी हरिण व काळविटांची शिकार करण्यासाठी जाळे लावले होते. हरिण या जाळ्यात अडकण्याची वाट पाहत हे शिकारी परिसरात लपून बसले होते. दरम्यान, अभयारण्यातील कर्मचारी नियमित गस्त घालत असताना त्यांना हा प्रकार दिसून आला. वनविभागाच्या कर्मचाऱयांना पाहून शिकाऱयांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र, त्यांची एक दुचाकी, दोन जाळे, कोयते व इतर मुद्देमाल तेथेच सोडला.
पुणे वन्यजीव विभाग येथील वनसंरक्षक रमेश कुमार, पुणे वन्यजीव विभाग अधिकारी भुरके, सहायक वनसंरक्षक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेहेकुरी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दुचाकीमुळे लागला आरोपीचा शोध
सापडलेल्या दुचाकीमुळे आरोपीची ओळख पटली. मेळघाट सायबर सेल या वन विभागाच्या विशेष विभागाच्या मदतीने ज्ञानेश्वर काळे याचे लोकेशन शोधण्यात आले. मात्र, तो तेथूनही पळून गेला. वन विभाग व कर्जत पोलिसांनी काळे याला अटक केली. न्यायालयाने त्याला मंगळवार (दि. 14) पर्यंत कोठडी सुनावली आहे.




























































