रेखा जरे हत्याकांड – बोठेचा अटकपूर्व जामिसाठी अर्ज, उद्या सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि फरार असलेल्या बाळ बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. अर्ज उशिरा दाखल झाल्याने यावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या पाचपैकी दोन आरोपींना न्यायालयीन, तर इतर तीन आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश उमा बोऱहाडे यांनी दिले आहेत.

फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे यांना न्यायालयीन, तर आदित्य सुधाकर चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार यांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्यामुळे त्यांना दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीला पाचही आरोपींची ओळख परेड करण्यात आली. 24 नोहेंबर रोजी मयत रेखा जरे यांचा अपघात घडवून आणण्यात येणार होता. त्यातील आरोपी तसेच, त्या घटनेत वापरण्यात येणारा टेम्पो हस्तगत करायचा आहे. हत्याकांडाचा सूत्रधार बाळ बोठे याने हत्याकांडासाठी दिलेल्या सुपारीची उर्वरित रक्कम हस्तगत करायची आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना अजूनही साथीदार असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची विचापूस करणे आवश्यक आहे. विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले असून, त्याअनुषंगाने सखोल चौकशी करायची असल्याने दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर तिघांना पोलीस कोठडी देण्याची विनंती तपासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत तिघांना पोलीस कोठडी सुनावली.

आरोपी फिरोज शेख व शिंदे यांचा पोलीस कोठडीचा अधिकार शाबूत ठेवून ओळख परेडसाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. ती न्यायायाने मान्य केली. सोमवारी न्यायालयात पाचही आरोपींच्या वतीने वकील उपस्थित होते.

जरे कुटुंबीयाची पोलीस संरक्षण देण्याची मागणी

n पत्रकार बोठे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. याआधीही त्याने आमच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रामध्ये केला आहे. बोठे याच्यापासून आम्हाला धोका असल्यामुळे आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्याने केली आहे.