दहशतवाद्यांसोबत संबंध; 11 सरकारी नोकरांना घरी बसवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीर प्रशासनाच्या सेवेतील कर्मचाऱयांचे थेट दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. देशविरोधी कार्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून 11 सरकारी नोकरांना सेवेतून बरखास्त केले आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सलाहुद्दीन याच्या दोन मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

दहशतवाद्यांशी संबंध असल्याने सरकारी नोकरीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱयांमध्ये अनंतनागमधील 4, बडगाममधील 3 आणि बारामुल्ला, श्रीनगर, पुलवामा आणि कुपवाडा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. शिक्षण विभाग, जम्मू-कश्मीर पोलीस, कृषी, कौशल्य विकास, विद्युत, आरोग्य विभागात काम करणारे हे कर्मचारी दहशतवाद्यांना अंतर्गत माहिती देत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जम्मू-कश्मीर प्रशासनाने देशविरोधी कार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱयांची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली होती. या समितीच्या दुसऱया बैठकीत 3 आणि चौथ्या बैठकीत 8 कर्मचाऱयांना सेवेतून काढून टाकण्याची शिफारस केली होती. यामध्ये कुपवाडाच्या एका अर्दलीचा समावेश आहे. तो दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा ओव्हरग्राऊंड वर्कर होता. तो दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या हालचालीविषयी माहिती देत होता. त्याच वेळी तो त्यांना आश्रय देत होता.

शिक्षक फुटीरतावादाचे समर्थक

  • अनंतनाग जिह्यातील दोन शिक्षक देशद्रोही कार्यात सहभागी असल्याचे आढळून आले. जे जमात–इस्लामी आणि दुख्तारन–ए–मिल्लत या फुटीरतावादी संघटनांच्या विचारसरणीला पाठिंबा आणि प्रचार करत होते.
  • सय्यद सलाहुद्दीन हा कश्मीरचा रहिवासी आहे, परंतु सध्या तो पाकिस्तानात राहणाऱया हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करत आहे. तो संयुक्त जिहाद परिषदेचा प्रमुखही आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबा यांनी संयुक्तपणे या संस्थेची स्थापना केली आहे.
  • सलाहुद्दीनचा दुसरा मुलगा सय्यद शकील युसूफ सरकारी रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता. हवालामार्गे तो दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याचे एनआयए, सीआरपीएफच्या तपासात आढळून आले आहे.
  • एनआयएचा दावा आहे की, हवालामार्गे पाकिस्तानकडून जम्मू-कश्मीरमध्ये पैसे पाठविण्यात येत होते. हा निधी दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांसाठी वापरला गेला.