मंगळसूत्र गळ्यातून काढून टाकणे ही पत्नीची मानसिक क्रूरता! उच्च न्यायालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पती हयात असताना त्याच्या नावाने बांधलेलं मंगळसूत्र गळ्यातून उतरवणं हा पतीला दिलेला पराकोटीचा मानसिक त्रास आहे असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती व्ही.एम.वेलूमणी आणि न्यायमूर्ती एस.सौंथर यांच्या खंडपीठाने त्यांच्यासमोर आलेल्या एका याचिकेवरील आदेशादरम्यान हे वाक्य नमूद केलं आहे. या खंडपीठाने म्हटले की, पत्नीने गळ्यातून मंगळसूत्र काढल्याने पतीच्या भावना दुखावल्या जातात. मंगळसूत्र ही एक पवित्र गोष्ट असते जी अखंड वैवाहीक जीवनाचे प्रतीक असते. मंगळसूत्र हे पतीच्या निधनानंतरच काढले जाते.

इरोड इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक सी.शिवकुमार यांनी घटस्फोटासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 15 जून 2016 रोजी कौटुंबिक न्यायालयाने शिवकुमार यांच्या घटस्फोटासाठीची याचिका फेटाळून लावली होती. या न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला आहे. शिवकुमार यांच्या पत्नीने न्यायालयात मान्य केलं होतं की तिने गळ्यातून मंगळसूत्र काढलं होतं, मात्र आपण मंगळसूत्राच्या वाट्या आपल्याकडे ठेवल्या होत्या, त्यातील चेन फक्त काढून घेतली होती असं तिचं म्हणणं होतं. महिलेच्या वकिलांचं म्हणणं होतं की मंगळसूत्र घालणं हे महिलेसाठी बंधनकारक नाहीये. पत्नीने मंगळसूत्र काढल्याने तिच्या वैवाहीक जीवनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. यावर न्यायालय म्हणाले की आपल्याकडील लग्नामध्ये पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणे हे आवश्यक मानले जाते. अशावेळी महिलेने गळ्यातून मंगळसूत्र काढणे हे तिने पतीला मुद्दाम त्रास देण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. ही क्रूरतेची पराकाष्ठा आहे. पतीच्या महाविद्यालयात जाऊन पत्नीने कर्मचारी, विद्यार्थी आणि पोलिसांसमोर त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावले होते. नवऱ्यावर खोटे आरोप करणं ही देखील एकप्रकारची मानसिक क्रूरता आहे असंही न्यायालयाने म्हटले आहे.