
शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे मालाड पूर्वेच्या रहेजा कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या शहीद विजय साळसकर उद्यानाचे नूतनीकरण होत असून या उद्यानाला पुन्हा झळाळी येणार आहे. हे उद्यान लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होईल होणार आहे.
दिंडोशी विभागातील वार्ड क्र. 36 येथील शहीद विजय साळसकर उद्यानाची दुरावस्था झाली होती. मॉर्निंग वॉक तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था नसल्याने शिवसेना नेते, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांनी उद्यानाच्या नूतनीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार उद्यानाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असून सुनील प्रभू यांनी नुकतीच कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या पालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी अमोल हितापे व ज्योती तुडस यांना त्यांनी काही सूचना केल्या. यावेळी शाखाप्रमुख अशोक राणे, माजी नगरसेवक सुनील गुजर, बाळा शिरोडकर, वामन तिरोडकर, सुरेश करपे, सुशांत चव्हाण, सुशांत पारकर, अल्पेश चव्हाण, अतुल पाखरे, विधानसभा संघटक रीना सुर्वे, उपविभाग संघटक रुचीता आरोस्कर आदी उपस्थित होते.
रॉक क्लायंबिंग, वॉकिंग ट्रक
शहीद विजय साळसकर उद्यानाची जागा सहा हजार पाचशे चौरस मीटर एवढी असून येथे लहान मुलांसाठी रॉक क्लायंबिंग हा गेम उपलब्ध करून देणार आहे. व्यायामाचे साहित्य, वॉकिंग ट्रक, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था, व्हिविंग गॅलरी ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उद्यानाच्या भिंतीला रंगरंगोटी करण्यात येणार आहे.



























































