
सामना ऑनलाईन, मुंबई
पेट्रोल आणि डिझेल शंभरी गाठण्याच्या मार्गावर असताना आता महागाईचा आगडोंब आणखी उसळण्याची शक्यता आहे. महागाई कमी करण्यापेक्षा आणखी कशी वाढेल यावरच सरकार भर देताना दिसत आहे. आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक येत्या आठवडय़ात होणाऱया पतधोरण आढावा बैठकीत व्याज दरांमध्ये 25 अंकांची वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज, सोने तारण कर्ज महागणार असून सर्वसामान्य या महागाईच्या आगीत होरपळून निघणार आहे.
येत्या 5 ऑक्टोबर रोजी आरबीआयची पतधोरण आढावा बैठक होणार असून या बैठकीत व्याज दरात वाढ होण्यावर अर्थतज्ञांनीही शिक्कामोर्तब केले आहे. आरबीआयने व्याज दरात वाढ केल्यास ही तिसरी वाढ ठरणार आहे. दरम्यान, आरबीआयने व्याज दरात वाढ केल्यास व्याज दर 6.50 टक्क्यांवर पोहचणार आहेत.
…म्हणून आरबीआय व्याज दरात वाढ करणार!
रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण आणि क्रूड तेलाचे गगनाला भिडणारे दर यामुळे आरबीआय यंदा व्याज दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचे संकेत आहेत. क्रूड ऑइलने यंदा चार वर्षांतील उच्चांक गाठला असून डॉलरच्या तुलनेत 36 पैशांनी घसरलेला रुपयाही 72.84 पर्यंत खाली आहे. हादेखील नवा उच्चांक आहे. या घडामोडींमुळेच आरबीआयवर व्याज दरात वाढ करण्याबाबतचा दबाव असल्याचे बोलले जात आहे.
रुपयाच्या घसरणीचा नवा उच्चांक
रुपयामध्ये सातत्याने घसरण होत आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 36 पैशांची घसरण होऊन तो 72.84 पर्यंत पोहचला. आरबीआयने या महिन्यात खुल्या बाजारातून 36 हजार कोटी रुपयांचे सरकारी बॉँड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तरीही ही घसरण दिसली. दरम्यान, क्रूड तेलाच्या वाढलेल्या किमतीचा परिणामही रुपयाच्या घसरणीवर झाला आहे.
ऑनलाइन शॉपिंगही महागणार
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ऑनलाइन शॉपिंगच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. ऑक्टोबरपासून जीएसटी कायद्यांतर्गत टीडीएस आणि टीसीएस लागू होत आहेत. त्यामुळे ई कॉमर्स कंपन्यांना टीसीएस कलेक्शन करण्यासाठी पुरवठादार उपलब्ध असलेल्या राज्यांमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगमध्ये वाढ होणार आहे.
एमसीएलआर म्हणजे काय?
बँकांसाठी कर्जांचे व्याज दर निश्चित करण्यासाठी तयार केलेले धोरण म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड लँडिंग रेट आहे. म्हणजेच एका बँकेकडून ग्राहकांकडून वसूल केला जाणारा किमान व्याज दर. हा व्याज दर रिझर्व्ह बँकेकडून निश्चित केला जातो. बँकांवर या व्याज दरापेक्षा कमी व्याज दर न आकारण्याचे बंधन असते. एप्रिल 2016 पासून हा नियम लागू झाला आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे महागाई आणखी वाढणार असून आरबीआयने व्याज दर वाढवल्यास सर्वसामान्यांना जगणेही मुष्कील होईल असे य्gैनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजकीरण राय यांनी सांगितले.
या बँकांनी वाढवले व्याज दर
एसबीआय, आयसीआयसीआय आणि पंजाब नॅशनल बँकेने कर्जांवरील व्याज दर वाढवले आहेत. हे व्याज दर या महिन्यापासून लागू झाले आहेत. एसबीआयने प्रत्येक वर्षासाठी एमसीएलआरमध्ये 0.05 टक्क्याची वाढ केली आहे. पीएनबीने एक महिन्यापासून ते तीन वर्षांपर्यंतच्या कर्जासाठी एमसीएलआरमध्ये 0.05 टक्क्याची वाढ केली आहे तर ताबडतोब मिळणाऱया कर्जाच्या व्याजात 0.02 टक्क्याची, आयसीआयसीआयने एक वर्षासाठीच्या कर्जासाठी एमसीएलआरमध्ये 0.10 टक्क्याची वाढ केली आहे. एमसीएलआरमध्ये झालेले हे बदल आजपासून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित बँकांच्या ग्राहकांना व्याज भरावे लागणार आहे.
एवढाच काय तो दिलासा मिळेल
- पुढचे तीन महिने छोटय़ा बचतींवर जादा व्याज दर मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत योजना, भविष्य निर्वाह निधी, किसान विकास पत्र यांसारख्या योजनांसाठी 0.40 टक्का जादा व्याज मिळेल.
- कॉल ड्रॉप झाल्यास नव्या नियमांनुसार संबंधित मोबाईल ऑपरेटर कंपनीला मोठय़ा प्रमाणावर दंड आकारण्यात येणार आहे.
- इलेक्ट्रोरल बॉण्डची विक्री 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. ज्यांना राजकीय पक्षांच्या निवडणूक निधीसाठी इलेक्ट्रोरल बॉण्ड द्यायचे आहेत ते एसबीआयकडून इलेक्ट्रोरल बॉण्ड खरेदी करू शकतात.

























































