गणेशभक्तांनो, 10 मेपासून करा रेल्वेचे आरक्षण!

यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावर सोडण्यात येणाऱया रेल्वेगाडय़ांचे आरक्षण 120 दिवसआधी म्हणजेच 10 मेपासून खुले होणार असल्याने गणेशभक्त कमालीचे सुखावले आहेत. नियमित रेल्वे गाडय़ांसह ‘गणपती स्पेशल’ गाडय़ांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट खिडक्यांवर चढाओढच सुरू होणार आहे.

कोकण मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल चालवणार, हे अद्याप रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेले नाही, मात्र 10 मेपासून गणेशोत्सवात धावणाऱया गाडय़ांचे आरक्षण खुले होणार आहे. यामुळे चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी येण्याचे नियोजन करणे सुकर होणार आहे. नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशल गाडय़ांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना प्रतीक्षा यादीवरच राहावे लागणार. गणेशोत्सवात गतवर्षीप्रमाणे कोकण मार्गावर दिवा-चिपळूण व दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल चालवण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने आतापासूनच नियोजनावर भर दिल्यास प्रवाशांच्या मार्गातील अडथळे दूर होऊन सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येईल.