
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसैनिकांनी पदरचे पैसे खर्च करून आपल्याला खासदार म्हणून निवडून आणले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडगळीतून उचलून पुत्रवत प्रेम दिले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोटय़वधीचा निधी दिला. तरीसुद्धा तुम्ही शेण खाल्लंत. त्यामुळे आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि लढायला मैदानात उतरा… असे खुले आव्हान संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर खासदार धैर्यशील माने यांना दिले. दरम्यान, मतदार संघात जिथे-जिथे जाल, तिथे-तिथे तुम्हाला पायताण हातात घेऊन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला.
शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झालेले हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज रुईकर कॉलनी येथील धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी भव्य मोर्चा काढला. काल रात्रीपासूनच निवासस्थानच्या दोनशे मीटर परिसरात पोलिसांकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. सर्व बाजूने तीन टप्प्यात पोलिसांचा फौजफाटा तैनात करून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मार्केट यार्ड परिसरातून शिवसैनिकांचा हा मोर्चा धैर्यशील माने यांचा निषेध करत त्यांच्या निवासस्थान परिसरात धडकला. पोलिसांनी हा मोर्चा अडविल्यानंतर रस्त्यावरच ठाण मांडून शिवसैनिकांनी ‘शिवसेना अंगार है… बाकी सब भंगार है…’ ‘शिवसेना जिंदाबाद…’ ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये मोठा राडा झाला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. खासदार माने यांच्या निवासस्थानी घुसताना पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांकडून शिवसैनिकांना ताब्यात घेऊन उशिरा सोडून देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आण्णासाहेब बिलोरे, नामदेव गिरी, मधुकर पाटील, साताप्पा भवान, बाजीराव पाटील, वैभव उगळे, दत्ता पवार, महिला संघटक मंगल चव्हाण आदी उपस्थित होते.
शिवसैनिक पायताण हातात घेऊन जाब विचारतील
मतदारसंघात येऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे वक्तव्य खासदार धैर्यशील माने यांनी केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना मुरलीधर जाधव म्हणाले, आधी शेण खाल्ले आणि आता भेटायची काय गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार माने हे आर्थिक अडचणीत होते. याचा आकडा 200 कोटींच्या पुढे होता. अरे, शिवसैनिकांनी वर्गणी काढून दिले असते. तुम्ही संपला होता. अडगळीत गेला होता. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसैनिक तुमच्यासाठी झटला. विनायक विभुते या शिवसैनिकाने तुम्हाला खासदार करण्यासाठी दोन लाखांची पैज लावली. मार्ंनग वॉकला लोकांना गुलाबाची फुले वाटली. याची तरी लाज वाटायला हवी होती, पण आता ज्या-ज्या वेळी मतदारसंघात याल त्यावेळी पायताण हातात घेऊनच शिवसैनिक या गद्दारीचा जाब विचारतील, असा इशाराही मुरलीधर जाधव यांनी दिला.

























































