
अख्ख्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीची वाताहात सुरू असताना आज पक्षाला ठाण्यातही सुरुंग लागला. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील हे मनमानी करत असून पक्षाचे निर्णय मला डावलून होत असतील तर पदावर राहण्यात काय अर्थ आहे, असा सवाल करीत पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगदाळे यांनी मिलिंद पाटील यांच्यावर चाप ओढला असला तरी त्यांना आमदार जितेंद आव्हाड यांनाच घायाळ करायचे होते. त्यामुळे जगदाळे यांचे कही पे निगाहे, कही पे निशाणा अशी उघड चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीच्या गटातटाचे राजकारण नवीन नाही. दिवंगत वसंत डावखरे, गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड या स्थानिक नेत्यांच्या तीन गटांभोवतीच राष्ट्रवादीच्या राजकारणाचे काटे फिरत आले आहेत. त्यापैकी डावखरे आता हयात नाहीत तर गणेश नाईक भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मनमानी सुरू झाल्याची चर्चा डावखरे आणि नाईक गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. मध्यंतरी याच कारणावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांनी दंड थोपटत थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रकरण शांत झाले असे वाटत असतानाच आज हणमंत जगदाळे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपली गळचेपी होत असल्याचे कारण देत आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिला. मध्यंतरीच्या काळात आपल्यावर अनेक संकटे कोसळली. पण यावेळी स्थानिक नेत्यांनी आपल्याला साथ दिली नाही. तरीही पुन्हा उभे राहात पालिका निवडणुकीत तितक्याच ताकदीने आपण नगरसेवकपदी निवडून आलो असे जगदाळे यांनी सांगितले. त्यानंतर आपल्याला गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली. पण हे पद आता आपल्यासाठी केवळ नामधारी सिद्ध झाले असल्याची कैफियत त्यांनी मांडली.
– राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभागामधला ठराव पारीत झालेला असताना ज्येष्ठ नेते त्यामध्ये हस्तक्षेप करतात.
– पालिकेतील दुसऱया क्रमांकाचा पक्ष असतानाही स्विकृत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य निवडून आणण्यात विरोधी पक्षनेत्याला अपयश आले आहे.
– पालिकेमध्ये पक्षाची काम करण्याची पद्धत व्यक्ती केंद्रित असून गटनेते पदाच्या प्रभागातील विकासकामे रोखण्यात येत असतील तर ते पक्षासाठी घातक असल्याचे हणमंत जगदाळे यांनी सांगितले.


































































