पेंग्विन सफारीसोबत आता लज्जतदार पदार्थांचा आस्वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पेंग्विन पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना आता लज्जतदार पदार्थ्यांचा आस्वादही घेता येणार आहे. पेंग्विन कक्षाच्या इमारतीमध्येच 533 चौरस मीटर जागेत सुरू होणार्‍या ‘कॅफेटेरिया’मुळे ही सुविधा मिळणार आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू होणार्‍या या उपाहारगृहाच्या माध्यमातून पालिकेला दरमहा साडेपाच लाखांचा महसूल भाडय़ाच्या स्वरूपात मिळणार आहे.

पालिकेने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीच्या मंजुरीनुसार करण्यात येणार्‍या कामांमध्ये प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ नव्याने एण्ट्री प्लाझा विकसित करण्यात आला असून यामध्ये तिकीटघर, प्याऊ, प्रसाधनगृह, सोव्हेनिअर शॉप, क्लोक रूम, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. 2017 मध्ये आणलेल्या पेंग्विनमुळे येणार्‍या पर्यटकांची संख्या सुट्टीच्या दिवशी 20 हजारांवर गेली आहे.

भाडय़ात प्रतिवर्ष पाच टक्क्यांची वाढ

पेंग्विन कक्ष तळमजल्यावर उभारण्यात आलेल्या कॅफेटेरियामध्ये वातानुकूलित यंत्रणा, आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व गॅसबँकची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. मे. परिचय ग्लोबल वर्क्स यांना पाच वर्षांसाठी कॅफेटेरियाचे कंत्राट देण्यात येणार आहे. यामध्ये दरमहा पालिकेला 5 लाख 50 हजार 25 रुपये भाडे मिळणार असून या भाडय़ात दरवर्षी पाच टक्क्यांची वाढ होणार आहे.