उपऱ्यांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता, 50 वर्षांच्या कारकिर्दीत 12 वेळा माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा, पण उमेदवारी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱयांना उमेदवारी दिली जात असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. अनेक दशके पक्षासाठी खस्ता खालेल्या कार्यकर्त्यांचा विचारही न करता बाहेरून आलेल्या लोकांना संधी दिली गेली. आम्ही केवळ सतरंज्याच उचलायच्या का अशा भावना ठिकठिकाणी व्यक्त होऊ लागल्या आहेत. आता तर सोशल मीडियावरूनही नाराजी जाहीर होऊ लागल्याने भाजपा नेते अस्वस्थ झाले आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील अडगळीत पडलेले नेते माधव भांडारी यांचा मुलगा चिन्मय भांडारी यांनी तर थेट सोशल मीडियावर पोस्ट टाकून निष्ठावंतांवर होणाऱया अन्यायाचा समाचार घेतला आहे.

भारतीय जनता पक्षाला मोठे करण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले, परंतु सत्ता आल्यानंतर पक्षाकडून त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळालेला नाही. इतर पक्षांमधून भाजपात आलेल्या लोकांना मात्र आमदारकी, खासदारकी देण्यात आली. नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दुसऱयाच दिवशी राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. अनेक इच्छुक मंडळी वर्षानुवर्षे संधीची वाट बघत असताना त्यांना डावलून पक्षनेतृत्वाने परस्पर घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्ते बेचैन आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांचा मुलगा चिन्मय यांनी तर सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहून आपल्या वडिलांवरील अन्याय उघडपणे मांडला आहे. भाजपाच्या स्थापनेपूर्वीपासून माझ्या वडिलांनी जनसंघ, जनता पक्षात काम केले. भाजपात त्यांना 50 वर्षे झाली. या कालावधीत 12 वेळा त्यांच्या नावाची चर्चा विधानसभा आणि विधान परिषद आमदारकीसाठी झाली, परंतु एकदाही संधी दिली गेली नाही, अशी खंत चिन्मय यांनी व्यक्त केली आहे.

प्रवक्ते म्हणून काम करत असतानाच माझ्या वडिलांनी संघटना उभारणीसाठीही जिवाचे रान केले. पदाचा आणि प्रभावाचा दुरुपयोग न करता राज्यभरातील हजारो लोकांना मदत केली. मंत्री, खासदार झालेले अनेक जण अन्याय झाला म्हणून ओरडताना आपण पाहिले. पण माझ्या वडिलांनी कधीच नाराज होऊन पक्षाचे काम थांबवले नाही, अशा भावना चिन्मय भांडारी यांनी व्यक्त केल्या. पित्यावरील अन्यायाचा मी आतापर्यंत मूक साक्षीदार बनून राहिलो. पण आज बोलावेसे वाटले आणि हे माझे वैयक्तिक मत आहे, असेही चिन्मय यांनी स्पष्ट केले आहे.