विद्यापीठ कलिना कॅम्पसमधील बेस्ट बस 318ची सेवा पूर्ववत करा, युवासेना सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाने कुलसचिवांची घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाने कलिना कॅम्पसमधून मार्गक्रमण करणाऱ्या बेस्ट बस क्र. 318च्या सेवेला सुरक्षेच्या कारणावरून मनाई केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याबाबत युवासेना सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेतली. कलिना कॅम्पसमधील बेस्ट बस क्र. 318ची सेवा पूर्ववत सुरू करा, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर कुलसचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बस मार्ग पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले.

बेस्टच्या मार्गात बदल केल्याने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. यासंदर्भात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन 318चा बस मार्ग पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

मॅरेथॉनसाठी जागा दिली जाते, तेव्हा सुरक्षेचे काय?

विद्यापीठाने एका विद्यार्थ्याच्या आंदोलनाचे निमित्त पुढे केले आहे. एक विद्यार्थी अनेक महिने आंदोलन करीत आहे. त्याला भेटण्यासाठी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी येत असल्याने सुरक्षा धोक्यात आल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. परंतु जेव्हा टाटा मॅरेथॉन, स्टेट बँक ऑफ इंडिया मॅरेथॉनसाठी विद्यापीठाची जागा दिली जाते, तेव्हा सुरक्षा धोक्यात येत नाही का, असा सवाल सिनेट सदस्यांनी उपस्थित केला.