लॉ परीक्षेचे निकाल रखडलेलेच,स्टुडंट कौन्सिलचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

जानेवारीमध्ये पार पडलेल्या तृतीय वर्ष लॉ परीक्षेच्या पाचव्या आणि पाच वर्ष लॉ परीक्षेच्या नवव्या सेमिस्टरचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत. परीक्षा संपून तब्बल 71 दिवस उलटले आहेत. त्यातच जून अखेरीस लॉ अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षादेखील होणार आहे. त्यामुळे हे निकाल लवकर जाहीर न झाल्यास लॉच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

स्टुडंट लॉ कौन्सिलने या रखडलेल्या निकालाविषयी कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर यांना पुन्हा पत्र दिले असून लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. या परीक्षा होऊन आता 71 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरीही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही दिवसांपूर्वी लॉ कौन्सिलने परीक्षा विभागात निकालाविषयी चौकशी केली असता सहा ते सात दिवसांचा अवधी लागेल, असे सांगण्यात आले मात्र हा अवधी देऊनही बराच कालावधी लोटला आहे, असे लॉ कौन्सिलचे प्रमुख डॉ.सचिन पवार यांनी स्पष्ट केले. निकाल लवकरात लवकर जाहीर न केल्यास शुक्रवार, 29 मार्चपासून  आंदोलनाचा इशारा लॉ कौन्सिलने दिला आहे.