
सामना प्रतिनिधी, मुंबई
सहाय्यक पोलीस आयुक्त विजय हरिश्चंद्र धात्रक हे निवृत्त होऊन तीन वर्षे लोटली तरी त्यांना अद्याप ग्रॅच्युईटी व इतर लाभाचा सुमारे 12 लाख रुपयांच्या रकमेचा परतावा मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून अदा करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालावे नाही तर मला आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा विजय धात्रक यांनी दै. ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.
सेवानिवृत्त होऊन मला तीन वर्षे लोटली आहेत. या अवधीत मी किमान 25 ते 30 वेळा मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. पोलीस आयुक्त व इतर कक्ष अधिकाऱयांच्या भेटी घेऊन पेन्शन नियमित करावी व मला माझी ग्रॅच्युईटी व कम्युटेशनची 12 ते 13 लाख रुपयांची थकबाकी लवकरात लवकर अदा करावी अशी लेखी विनंती केली आहे, परंतु मला तीन वर्षांत अद्याप कुणी लेखी उत्तर दिलेले नाही. विभागीय चौकशी संपलेली नाही असे कारण सांगून मला मानसिक त्रास देण्याचा मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील कक्ष अधिकाऱयांकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, नाहीतर मी आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहे असेही धात्रक यांनी दै. ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
नेमके प्रकरण काय?
बिपीन बिहारी हे मुंबईच्या पश्चिम परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना त्यांच्या कार्यालयात धात्रक ‘रीडर’ म्हणून काम करीत होते. त्यावेळी जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुह्यासंबंधी धात्रक यांचीही चौकशी झाली होती, परंतु त्या चौकशीतून काहीही निघालेले नाही. त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या धात्रक यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना एसीपी म्हणून बढतीही देण्यात आली; परंतु अद्याप ग्रॅच्युईटी व इतर थकबाकी देण्यात आलेली नाही. त्यामुळे निवृत्त जीवन जगणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाला आता रस्त्यावर उतरून उपोषण करण्याची वेळ आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
summary- निवृत्तीचे १२ लाख थकले; निवृत्त एसीपी धात्रक यांचा उपोषणाचा इशारा





























































