GST च्या नावाखाली जनतेकडून लुटलेले लाखो कोटी रुपये परत करा; आपचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

आम आदमी पक्षाने (आपने) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीएसटी सुधारणांवर टीका केली आहे. सरकार जीएसटी कर व्यवस्थेद्वारे नागरिकांना लुटत आहे. तसेच देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत असून जनतेच लक्ष दुसरीकडे व्धत असल्याचा आरोप केला. जीएसटीच्या नावाखाली सरकारने जनतेकडून लुटलेले लाखो कोटी रुपये परत करा,अशा शब्दांत आपने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

केंद्राने गेल्या आठ वर्षांत जीएसटीच्या रूपात कोट्यवधी रुपये लुटले आहते. सरकारने ते परत करावेत, असे आपने म्हटले आहे. जीएसटी व्यवस्थेद्वारे सरकार जनतेला लुटत असल्याचा आरोप आप नेते आणि खासदार संजय सिंह यांनी केला आहे. सामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडला आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या आठ वर्षांत जीएसटीच्या नावाखाली देशातील जनतेकडून लुटलेले लाखो कोटी रुपये त्यांच्या खात्यात परत करा. स्वित्झर्लंडचे घड्याळ, जर्मनीचे पेन, इटलीचे चष्मे, अमेरिकेचे फोन, परदेशी कार, हेलिकॉप्टर आणि विमाने हे सर्व वापरणारे मोदीजी आज स्वदेशीवर व्याख्यान देत होते,असा टोलाही त्यांनी हाणला.

ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज यांनी इतर महत्त्वाच्या बाबींवर पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि बदल आधीच जाहीर झाले असल्याने आजच्या मोदी यांच्या भाषणात नवीन काहीच नव्हते. असे वाटत होते की पंतप्रधान मोदी एच-१बी अर्जदारांना प्रायोजित करणाऱ्या कंपन्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १,००,००० डॉलर्सची वाढ किंवा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काबद्दल काहीतरी बोलतील, परंतु मोदी त्याबाबत काहीही बोलले नाहीत.

जीएसटी ही एक अशी व्यवस्था आहे ज्याने देशातील सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात किमान सुधारणा आणणे अत्यंत चुकीचे आहे, असे आपच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर म्हणाल्या. जर तुम्ही अशी कर व्यवस्था आणली आहे, ज्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे आणि आज तुम्ही त्यात काही सुधारणा करत आहात आणि त्यासाठी स्वतःची पाठ थोपटत आहात, जरी त्या सुधारणा अद्याप लागू केल्या गेल्या नसल्या तरी, मला वाटते की हे अत्यंत चुकीचे आहे,असे त्या म्हणाल्या. कक्कर यांनी देशभरात एकसमान करांच्या पंतप्रधानांच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले.