
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने वेळोवेळी राज्याचे महसूलमंत्री आणि महसूल सचिवांची भेट घेत आपल्या न्याय्य मागण्या तत्त्वतः मंजूर करून घेतल्या आहेत, पण या मंजुरीला सहा महिने उलटल्यावरही शासनाकडून त्यांच्या अंमलबजावणीची हालचाल झालेली नाही. त्यामुळे संतप्त महसूल कर्मचार्यांनी आपल्याला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा या मागणीसाठी नुकतेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, कुर्ला, अंधेरी व बोरिवली येथे घंटानाद आंदोलनाचे आयोजन केले होते. मुंबईतील तिन्ही तहसीलदार कार्यालयांसमोर पार पडलेल्या या आंदोलनास कर्मचार्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र शासन महसूल कर्मचार्यांना दिलेली आश्वासने पाळत नसून कर्मचार्यांची फसवणूक करीत असल्याची संतप्त भावना राज्यातील महसूल कर्मचार्यांत आहे. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय सावे, सरचिटणीस विप्रदास परुळेकर आणि कार्याध्यक्ष संतोष दळवी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ठिकठिकाणी घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. महसूल कर्मचार्यांना दिलेली आश्वासने सरकारने न पाळल्यास समस्त राज्यात आंदोलन छेडण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.
उद्धव ठाकरे यांना घालणार साकडे
महसूल कर्मचार्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करावी असे साकडे महसूल कर्मचारी संघटना घालणार आहे. तसेच कर्मचार्यांना शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा असे विनंतीचे निवेदन मुंबई उपनगर जिह्यातील आमदारांना देण्यात येणार आहे.




























































