दखल – हिरवाईचे बीज

>> मंजूषा जाधव

मुलांचे आवडते शिक्षक, कवी, लेखक आणि कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांचा नवा बालकवितासंग्रह ‘पाऊसपाणी हिरवी गाणी’ हाती येताच ऐन उन्हाळ्यात एक सुखद गारवा अनुभवता आला.बालविश्वात सहज प्रवेश करणारे आव्हाड सर मुलांच्या मनाचा अचूक ठाव घेतात. पहिल्याच कवितेत बहरलेले झाड, खळाळता झरा, उंच पर्वत अशा निसर्गातील गोष्टी पाहून मुलाला काय काय व्हावेसे वाटते आणि शेवटी…

‘आई म्हणते, आधी माणूस हो, शोभून दिसशील जनांत!’ खरंच, आईचा किती थोर संदेश सरांनी दिला आहे. ‘दोस्त’ या कवितेत कोकीळ, पावशा अशी चिमणी पाखरं बाळाचे दोस्त बनतात. ‘झाडा झाडा नाच रे, आभाळाला वाच रे’ असे झाडाशी संवाद करत मूल त्याच्या हिरव्या रंगाशी एकरूप होताना दिसते. ‘पाखरांना ठाऊक सारे’ ही कविता तर माणसाला मोठी शिकवण देऊन जाते.

सारे एक होऊन कसे थव्याने उडावे
उंच आकाशात कसे शांत विहरावे

सतत पुढेच वाहत जाणाऱया ‘नदीचे गाणे’ गुणगुणताना नदीची स्वच्छता, मधुरता आपण राखली पाहिजे. नदीचे गाणे हेच शिकवते, तर ‘मित्र’ या कवितेतून अमर्याद, अफाट, अचाट, विस्तीर्ण अशा सागराची विविध रूपे, किनाऱयावरील वाळूतील खेळ अशा गमती जमती कविता वाचनाची मौज आणतात. मनोरंजनामधूनच मुलांचा सर्वांगीण विकास डोळ्यांपुढे ठेवून आव्हाड सर काव्यरचना करतात. ‘कष्टाचे महत्त्व’, मोड आलेली कडधान्ये कशी पौष्टिक असतात हे आईच्या गोष्टीतून सांगितले आहे. एकनाथ आव्हाड सरांचे बालसुलभ आणि निसर्गसुलभ मन. अंत:करणाची संवेदनशीलता आणि सूक्ष्मता असल्यामुळे मुलांचे आगळेवेगळे विश्व ते अनुभवू शकतात. त्यांच्या लेखनातून, कथाकथनातून मुले आणि पालकही शिकत, फुलत राहतात.