
>> देवानंद भुवड
गाज अंतरीची’ हा कवयित्री अमिता बागवे-राणे यांचा अवघ्या पन्नास कविता समाविष्ट असलेला छोटेखानी काव्यसंग्रह. काव्यसंग्रहाचे आकारमान जरी साधारण असले तरी यातील प्रत्येक कविता ही वैविध्यपूर्ण आणि आशयघन आहे. आनंदाच्या ऊर्मीबरोबर उचंबळून आलेल्या भावभावनांची शब्दकिमया कवयित्रीने या संग्रहात चितारलेली दिसून येते. माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकसनशीलतेच्या वाटेवर होत जाणारे बदल, त्यामध्ये बालपण, आसपासचा परिसर, शालेय जीवनातील उत्साह, तारुण्यसुलभ भावभावनांची गुंतागुंत, विवाहबंधनातील स्त्र्ााrसुलभपणा कवितांमध्ये शब्दबद्ध झालेला आहे.
डोळय़ांच्या सीमा विस्फारून
बुडणाऱया सूर्याला करावं बंदिस्त
आणि ऐकावी धुंद होऊन
गाज अंतरीची…
अशा अनेक काव्यपंक्तीतून शब्दबद्ध झालेल्या चमत्कृतीपूर्ण कल्पनाविष्काराने काव्यानंद लुटता येतो. फेसाळणारा उत्साह जीवनात आणण्यासाठी स्वप्नांचे डोळे उघडण्याची उमेदही या कवितेतून कवयित्रीने दिलेली आहे. तसेच ‘मनकल्पना’ या कवितेत अधुरेपणाच्या उरातील काहुराच्या प्रश्नजाळय़ाची उकल अत्तर शिंपून प्रतिभा सुगंधात नहाल्याचे स्पष्ट करून एक वेगळी शब्दअनुभूती वाचकांपुढे ठेवलेली आहे. अमिता बागवे-राणे यांच्या कवितेचा बाज एकंदरीतच संस्कारक्षम मनाचा ठाव घेणारा आहे.
जीवनातील साधी-सोपी उदाहरणे देऊन वास्तवाचे बोलके चित्रण करण्यात कवयित्रीचा हातखंडा असल्याचे सहज दिसून येते. ‘कट्टी-बट्टी’, ‘लहानपण’, ‘तडजोड’, ‘दहा बाय बाराची खोली’, ‘भूक’, ‘झोपाळा’, ‘आई आणि देव’, ‘मातृवंदना’ या कवितांमधून स्वानुभवाचे दर्शन घडते. तर पुढे पुढे त्यांची कविता ही समाजव्यवस्थेवर भाष्य करताना जाणवते. शेतकऱयांची आत्महत्या, राजकारण्यांचे कुटील डाव, स्त्र्ााrशक्तीचा जागर, मुलगी पाहण्याच्या प्रसंगातील मुलीची अगतिकता अशा ज्वलंत प्रश्नांचा विचार कधी उपहासात्मक तर कधी उघडपणे केलेला आढळून येतो. ‘झोपाळा’, ‘प्राणसखा’, ‘मिलन’, ‘निसर्गचक्र’ यांसारख्या कविता सुखद अनुभवावर बेतलेल्या आहेत. अमिता बागवे-राणे यांच्या कविता या प्रगल्भ विचारधारेचा स्रोत म्हणावे लागेल. ‘गाज अंतरीची’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह असला तरीही परिपक्व आहे. ‘सख्खे सोबती’ या नातेसंबंधातून हा काव्यसंग्रह साकारलेला आहे. मनोहर बागवे यांचे मुखपृष्ठ आणि कॅलिग्राफी काव्यसंग्रहाचे दृश्यमूल्य वाढवणारे आहे.
गाज अंतरीची (काव्यसंग्रह)
कवयित्री – अमिता बागवे-राणे
प्रकाशक – संगीता गवंडे, अर्चना कामेरकर
पृष्ठs – 50.





























































