शोध-एका रहस्याचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता दामले

‘शोध’ ही मुरलीधर खैरनार यांची शिवकालीन घटनांचे गूढ उकलणारी एक दर्जेदार ऐतिहासिक कादंबरी आहे. मुरलीधर खैरनार पत्रकारिता, रंगभूमी तसेच कथा, कविता, एकांकिका, नाटक इ. साहित्य प्रकार या सर्वांतून लीलया संचार करतात. एकदा वाचायला सुरुवात केल्यावर हाताला घट्ट चिकटणारी ‘शोध’ ही संशोधनात्मक कादंबरी आपल्याला इतिहास आणि वर्तमान या दोन्हींची ओढ लावते. नाशिकच्या ‘कुसुमाग्रज’ प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्तीच्या सहाय्याने संशोधन करून खैरनार यांनी या कथाबीजाला मूर्तस्वरूप दिले आहे.

शिवाजी महाराजांनी दुसऱयांदा ‘सुरत’ लुटली, पण ती सारी लूट स्वराज्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्याचा अर्धा भाग कुठे गेला हे साडेतीनशे वर्षे न उलगडलेले कोडे आहे. प्रो. अभोणकर आणि शशांक व निनाद यांना इतिहासाचे अभ्यासक म्हणून या घटनेमध्ये रस आहे. आबाजींना त्यांच्या गुरुजींचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कोणताही मार्ग पत्करण्याचा विधिनिषेध त्यांनी ठेवलेला नाही. खोजनार केतकी ही या कादंबरीची नायिका आहे. केतकीला आपल्या पूर्वजांकडून लुटून नेलेला शिवमंथक परत मिळवून आपल्या घराण्याचे पूर्ववैभव परत मिळवायचे आहे. त्यासाठी तिचे आयुष्य क्रतस्थ व वाहिलेले आहे.

कादंबरीतील सारी पात्रे आपल्या ध्येयाच्या दिशेने निरंतर प्रवास करीत आहेत. आबाजींच्या शोधाला स्कायलार्कच्या अजित चौधरींचा भक्कम आधार आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे साधनसुविधा आणि तज्ञ मार्गदर्शन विपुल आहे, पण साधनशूचितेचा मात्र अभाव आहे. प्रा.अभोणकर यांचा या इतिहासाचा अभ्यास कूर्मगतीने सुरू आहे. मात्र त्यांना शौनक, निनाद, साहिल यांच्यासारखा बुद्धिमान शिष्यवर्ग मिळाला आहे जो त्यांना खजिन्यापर्यंत पोहोचायला सहाय्य करणार आहे. केतकीला खोजनारीचे बाळकडू आणि वारसा दोन्ही मिळाले आहे. ही मुलगी शूर, अभ्यासू आणि टेक्नोसॅव्ही आहे.

साल्हेर सालोटी, मुल्हेर, हरगड, भरत पर्वत यांचे बागलाणातील व शिवकालीन इतिहासातील स्थान याचे स्थलकालानुरूप उल्लेख येतात. तसेच सातपुडा पर्वतरांगेतील अचला – अहिवंत, तावलीचा डोंगर, कांचना – धोडप, कोळदेहेर – राजदेहेर – इंद्राई हे सगळे हातगडपासून चांदवडपर्यंत पसरलेले सातमाळा पर्वतरांगेतील किल्ले, त्यांचा नकाशा, त्यांची भौगोलिक स्थाने या साऱयांची अचूक सांगड घालत कथानक बेतलेले आहे. सप्तशृंगगडावरील देवळे, पठारे, डोंगरांच्या खाचा, तिथे कोणते वाहन जाऊ शकेल याचा खराखुरा विचार लेखक नेहमीच करतो. तसेच पोलिसी खाक्या, बंदोबस्त आणि मर्यादा यांचीही वर्णने कथानकाच्या ओघात सहजच येतात. अचूक तांत्रिक, ऐतिहासिक व भौगोलिक उल्लेख हे या कादंबरीचे बलस्थान आहे.

सगळी पात्रे फक्त आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करतात व त्या पात्रांचा विकासही कथावर्तुळाच्या मर्यादा ओलांडत नाही. यात कुठेही विनाकारण भावनिक गुंतागुंत किंवा भडक प्रसंग घालून कादंबरीची रोचकता वाढवलेली नाही. भाषा अत्यंत सहज व प्रवाही आहे. घटनाक्रमांची शृंखला यथायोग्य विणलेली आहे. तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर चाललेला हा शोध वाचकांची उत्कंठा वाढवत राहतो.

सप्तशृंगगडाच्या परिसरातील तीन दरेगावे, तिथे राहणारे आदिवासी लोक, त्यांचा भाया हा वर्षातील प्रमुख उत्सव आणि त्या भायामागे प्रचलित असलेली लोककथा सारे शौनक आणि केतकीबरोबर वाचकालाही दरेगावात घेऊन जातात. डोंगरकिल्ल्यांमधील गौळ, त्यांची रचना, त्यांचे प्रयोजन आणि स्थानिकांच्या श्रद्धा आपले कुतूहल जागृत करून आपल्याला स्वतःकडे बोलावतात. जॅक्सन इतिहासाचा लोकजीवनाचा एक अभ्यासक संशोधक होता हे वाचल्यावर संमिश्र भावना जन्म घेतात.

स्वामिनिष्ठा, सहकार्य, ध्येय्याकांक्षा, जिद्द, चिकाटी, प्रेम अशा मानवाच्या सप्रवृत्तींबरोबरच दुष्टपणा, खुनशीपणा, सत्तेचा आणि संपत्तीचा गैरवापर, भ्रष्टाचार अशा कुप्रवृत्तींचा संचारही जागोजागी आढळून येतो. शिवकालीन समाज व्यवस्था, संस्कृती, मूल्ये तसेच संदेशवहन व वाहतूक व्यवस्था यांचा परिचय कथानकातून होतो आणि नकळत आजच्या व्यवस्थांशी आणि साधनसुविधांशी त्यांची तुलना न कळत होते. मोरोपंत, संभाजी महाराज यांनी अनेक वर्षे प्रयत्न करूनही खजिना शोधणे शक्य झाले नाही. साडेतीनशे वर्षांनंतर ही गोष्ट वर्तमानात साध्य होईल का ही उत्कंठा वाचकांच्या मनात निराशेची एकही लहर न उमटू देता अंतापर्यंत जागृत ठेवणे हे रहस्यकथेचे मोठे यश आहे. या कथानकामध्ये उत्तम चित्रकथेचे मूल्य आहे. ‘शोधाचा’ हा थरारही चार ओळीत सांगण्याची नव्हे, तर प्रत्येक पानामधून अनुभवण्याची गोष्ट आहे.

शोध
लेखक – मुरलीधर खैरनार
प्रकाशक – राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठ – 497, मूल्य – रु. 500/-