परीक्षण : गाण्यांचा अमूल्य खजिना

86


>> श्रीकांत आंबे

अनंत पावसकर हे खऱया अर्थाने हिंदी-मराठी गाण्यांमध्ये आकंठ बुडालेले व्यक्तिमत्त्व. ज्यावेळी एखाद्या गाण्याचे, त्याच्या शब्दसुरांचे, संगीताचे, गायकीचे, गाण्याच्या पार्श्वभूमीचे, ध्वनिमुद्रणाचे, गायक-गायिकांच्या व्यक्तिमत्त्वाचे त्यांना भावलेले सौंदर्य ते उलगडून दाखवतात त्यावेळी त्या गाण्यात दडलेल्या सौंदर्याच्या अनुभूतीचा आस्वाद रसिकांनाही नव्याने भावतो. 1994 च्या सुमारास दै. ‘सामना’च्या ‘फुलोरा’ पुरवणीत त्यांची ‘आठवणीतील गाणी’ ही लेखमाला भरपूर लोकप्रिय झाली. नंतर तिचे त्याच नावाने आकर्षक पुस्तकही निघाले. पावसकर त्या काळात एका प्रसिद्ध संगीत कंपनीत ध्वनिमुद्रण अधिकारी असल्यामुळे वेगवेगळय़ा सर्वच प्रकारांतील गाण्याच्या निर्मिती प्रक्रियेत साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यातील प्रत्येक टप्पा अनुभवता आला तसेच डोळसपणे अभ्यासताही आला. गीत-निर्मिती ही गोष्ट तिची ध्वनिमुद्रिका वा कॅसेट-सीडी बाहेर पडेपर्यंत किती धुंदावणारी आणि नादावणारी असते याची प्रचीती आली. अनेक प्रसिद्ध गायक-गायिका, गीतकार, संगीतकार, वादक, ध्वनिमुद्रक, संगीत संयोजक यांचे अनुभव त्यांना एक दृष्टी देऊन गेले.

गाणे आणि संगीत हा आपल्यासारख्या गुणग्राहक रसिकाचाही श्वास बनू शकतो आणि हा अनुभव आपण आपल्या प्रतिभेने रसिक वाचक आणि श्रोत्यांना देऊ शकतो याची खात्री पटल्यानेच हा लोकप्रिय हिंदी-मराठी गाण्यांचा खजिना म्हणजे ‘लिजंडस्’, ‘आठवणीतील गाणी ः आपला स्वतःचा कराओके क्लब’, ‘आपली आवड’ आणि ‘आठवणीतील गाणी’ ही त्यांची चार ई-बुक्स ई-साहित्यतर्फे प्रकाशित झाली आहेत. `Legends 7777′ यात सुमारे 7777 गाणी आहेत. आपला स्वतःचा असा multiplex ज्याद्वारे आपण 1933 ते 2018 या काळातील गाजलेले उपलब्ध चित्रपट थेट आपल्या स्मार्ट टीव्हीवर कधीही, कुठेही पाहू शकतो. गाणी ऐकण्याची आणि जुने-नवे चित्रपट पाहण्याची आवड असणाऱयांसाठी खरोखरच हा एक अनमोल संग्रह आहे. या संदर्भ ग्रंथाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात आपले सर्व आवडते गायक, गीतकार, संगीतकार व त्यांच्या गाण्यांच्या यू-टय़ूबच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तसेच बिनाका गीतमाला, विविध रेडिओ कार्यक्रम, मुलाखती यांच्याही यू टय़ूब लिंक्स दिलेल्या आहेत.

‘कराओके क्लब’ या ई-बुक संदर्भ ग्रंथातील संकलनाचे वैशिष्टय़ म्हणजे यात आपल्या सर्व आवडत्या गायक, गीतकार, संगीतकार व त्यांच्या गाण्यांच्या कराओके ट्रक्सच्या यू टय़ूबच्या लिंक्स आहेत. इथे गायकीचे नीरक्षीर मार्गदर्शनही आहे. आपण ती लिंक थेट आपल्या स्मार्ट टीव्हीवर पाहून त्यासोबत गाऊ शकाल. ‘आपली आवड’ या ई-बुक संदर्भ ग्रंथात 1953 ते 1977 पर्यंतचे सर्व सुप्रसिद्ध चित्रपट व त्यातील सर्व गाण्यांच्या यू-टय़ूब लिंक्स दिलेल्या आहेत. हा सारा खजिना आपण आपल्या स्मार्ट टीव्हीवरसुद्धा पाहू शकतो.

‘आठवणीतील गाणी’ या ई-बुक संदर्भ गंथाची ही दुसरी आवृत्ती आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे यात आपल्या आवडत्या गाण्यांच्या आठवणींसह संबंधित गाणे, कराओके ट्रक, गीतसंग्रह, संपूर्ण चित्रपट व इतर संग्राह्य यू टय़ूबच्या लिंक्स दिलेल्या आहेत. आपल्या स्मार्ट टीव्हीवरसुद्धा हे पाहता येईल. 1990 पासून बदलत्या काळात 15 वर्षांत तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आणि चित्रपट संगीत रसिकांच्या अगदी हातात आणून दिले. मात्र हा संगीताचा अवाढव्य डेटा उपलब्ध जरी होत असला तरी त्याची मांडणी व्यवस्थित होत नव्हती. जी व्यक्ती ‘टेक्नोसॅव्ही’ नाही तिला खूप अडचणी येत असत. मात्र अनंत पावसकर यांनी आपल्या चारही ‘ई-बुक्स’च्या सहाय्याने रसिकांना हवी असलेली सर्व माहिती व्यवस्थित एका ठिकाणी वर्गीकरण करून दिली आहे. यातील लताबाई निवडल्या की, त्यांनी विविध संगीतकारांबरोबर गायलेल्या गाण्यांच्या यू टय़ूब लिंक्स दिसतात. त्या ‘ओपन’ करून ऐकण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. त्याबरोबरच संबंधित काही दुर्मिळ व्हिडीओ पाहायला मिळतात.

सैगल, रफी, किशोर, मुकेश, तलत, मन्ना डे, आशा, नूरजहाँ, शमशाद, गीता दत्त, सुरैया, शैलेंद्र सिंग, हरिहरन, बाल सुब्रमणियम, कविता कृष्णमूर्ती ते अलीकडच्या पिढीतील अरीजितसिंगपर्यंतच्या सर्वांच्या सर्व गाण्यांच्या यू टय़ूब लिंक्स पाहायला मिळतात. संगीताच्या सुवर्णकाळातील सर्वोत्कृष्ट संगीतकार नौशाद, सचिनदेव बर्मन, मदन मोहन, खय्याम, आर. डी. बर्मन, सलील चौधरी इ. संगीतकारांची किमान शंभर गाणी व त्यांच्या यू टय़ूब लिंक्स दिसतात. प्रसिद्ध गीतकारांची गाणी, गाजलेल्या मुलाखती, अमीन सयानींनी गौरवलेली 100 सुपरहिट गाणी, मुजरा, कव्वाली, भजने, अनुप जलोटांची ‘भजन संध्या’, दांडियाची सर्व गाणी आणि 1933 पासून 2018 पर्यंत गाजलेल्या सर्व चित्रपटांच्या यू टय़ूब लिंक्स दिलेल्या आहेत. गिटार, बासरी शिकवण्याच्या लिंक्स आहेत. लेखक पावसकर यांनी ही ई-बुक तयार करण्यासाठी तीन वर्षे खूप मेहनत घेतल्याचे जाणवते. मात्र रसिकांना हा खजिना त्यांनी अक्षरशः मोफत उपलब्ध करून दिला आहे. www.o sahity.com या साइटवर रसिकांजवळ फक्त स्मार्टफोन आणि नेट कनेक्शन असेल तर त्याला या खजिन्याने अक्षरशः ‘घेता किती घेशील दो कानाने आणि एका मनाने’ असे होऊन जाईल.

लिजंडस्- पृष्ठs – 75
आठवणीतील गाणी – आपला स्वतःचा कराओके क्लब – पृष्ठs – 9
आपली आवड – पृष्ठ – 691
आठवणीतील गाणी – पृष्ठ – 257
लेखक – अनंत पावसकर

आपली प्रतिक्रिया द्या