धप्पा – छोट्यांची मोठी गोष्ट

>>रश्मी पाटकर, मुंबई

हिंदुस्थानाने लोकशाहीप्रधान असलेलं राज्य निर्माण करताना अनेक मूलभूत स्वातंत्र्यांचा स्वीकार केलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा. या मुद्द्यावर सध्या गेला काही काळ अवघा देश ढवळून निघताना दिसतोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती असावं, कसं असावं आणि कशा प्रकारे ते पोहोचवण्यात यावं, यावर प्रत्येकाचा स्वतंत्र विचार आणि मत असणार हे उघड आहे. पण, मोठ्यांच्या जगात घडणाऱ्या या उहापोहाकडे आजची लहान मुलं काय नजरेने पाहतात, त्यांच्यापर्यंत या सगळ्याचा नेमका काय अर्थ पोहोचतो आहे, हा खरंतर संशोधनाचा विषय होऊ शकतो. कारण, तेच आपलं भविष्य आहेत. समाजात भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे ही लहान मुलं कशी बघतात, त्यांच्यावर या सगळ्याचा काय परिणाम होतो आणि ती याला कशी काय सामोरी जातात, हे मांडणारा ‘धप्पा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या मांदियाळीतला ‘स्वर्गीय नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ मिळवणारा चित्रपट ही ‘धप्पा’ची ओळख तमाम मराठी जनांसाठी अभिमानाची आहे.

स्मार्टफोनच्या जोडीने वेगाने बदलत जाणारं जग या मुलांच्या संवदेनशीलतेची कसोटी पाहणार, हे ढळढळीतपणे दिसत असताना मुलंही त्या कसोटीवर खरी उतरू शकतात, याचा प्रत्यय धप्पा पाहताना येतो. विषय जरी गंभीर असला तरी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारींनी त्याची मांडणी मात्र अत्यंत गमतीदार आणि लोभसवाणी केली आहे. कथा सुरू होते तेव्हा दिसतं ते एक मोठं गृहसंकुल. त्यात राहणारी, एकत्र शाळेत जाणारी, लहान मोठ्या वयाची मुलं. अभ्यास, शाळा सगळं सांभाळून ही मुलं दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त काही ना काही नाटुकल्या सादर करत असतात. एका वर्षी पर्यावरण संवर्धनासाठी ते एक विशिष्ट नाटक बसवायचं ठरवतात आणि तिथेच वादाला तोंड फुटायला सुरुवात होते. या नाटकात संत तुकाराम आणि येशू ख्रिस्त यांची पात्रं असतात. त्यावरून भडकलेल्या काही तथाकथित संस्कृतीरक्षक संघटना नाटकात बाधा आणतात. गुंडगिरी करून सोसाटीत घुसत नेपथ्याची तोडफोड करतात, मारहाणही करतात. त्यामुळे या मुलांचे पालक नाटक न करण्याचा निर्णय घेतात. पण, लहान मुलांना ते पटत नाही. त्यांच्या मनाची चलबिचल होत असताना ते सर्वानुमते पुन्हा एकदा नाटक सादर करण्याचा निर्णय घेतात. मात्र, यावेळी ही त्यांची मोहीम मोठ्यांपासून त्यांनी लपवलेली असते. आपल्या नाटकाचा प्रयोग सादर होण्यासाठी ते काय करतात, त्यांचा प्रयोग सादर होतो की नाही, ही लहान पण डोकेबाज मुलं मोठ्यांच्या राजकारणाला कसा धप्पा देतात, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

या चित्रपटाची कथा जरी लहान मुलांवर बेतली असली तरी तिला एका मिश्कील, तिरकस दृष्टिकोनाची झालर आहे. मुलांच्या नजरेतून दिसणारं मोठ्यांचं जग, त्यांना पडणारे प्रश्न, त्यांची मस्ती-कुस्ती, धमाल आणि यंत्रांच्या जगात वावरताना मनात जपलेली संवदेनशीलता या सगळ्याचा प्रत्यय धप्पा पाहताना येतो. जवळपास आठ ते दहा जणांच्या चमूने यात नुसता धुडगूस घातला आहे. आकाश कांबळे, शारवी कुलकर्णी, अक्षय यादव, शर्व वढवेकर, श्रीहरी अभ्यंकर, दीपाली बोरकर, अभिजीत शिंदे, नील देशपांडे या मुलांनी त्यांना दिलेल्या भूमिकांमध्ये अगदी जीव ओतून काम केलं आहे. लहान मुलांचं छोटंस जग, त्यातल्या त्यांच्या छोट्या छोट्या इच्छा, त्यांच्या खोड्या, प्रसंगी मोठ्यांची खोडी काढून त्यांनाच वेडावून दाखवण्याची खट्याळ तितकीच निरागस वृत्ती हे सगळं या लहान मुलांनी आपल्या अभिनयातून साकार केलं आहे. इतक्या लहान मुलांकडून चित्रपटासाठी हवा तसा अभिनय करून घेण्यासाठी निपुण धर्माधिकारी यांना विशेष गुण द्यावे लागतील. या मुलांच्या पालकांच्या भूमिकेत वावरणाऱ्या वृषाली कुलकर्णी, सुनील बर्वे, गिरीश कुलकर्णी, चंद्रकांत काळे, इरावती हर्षे यांनीही आपल्या भूमिका अगदी चोख निभावल्या आहेत. ज्योती सुभाष यांनी साकारलेल्या देवभोळ्या मोहिते आजी धमाल आणतात. चंद्रकांत काळे यांनी रंगवलेले खडूस, कंजूष सोमण काकाही बेस्ट. त्यांच्यासोबतचे लहान मुलांचे प्रसंग हसून मुरकुंडी वळवतात.

चित्रपटाचा विषय गंभीर असला तरीही याची मांडणी अत्यंत धमाल आहे. विशेष म्हणजे, या प्रसंगामधलं नाट्य त्यांनी कुठेही ताणलेलं किंवा अतिरंजित झालेलं नाही. चवीपुरतंच नाट्य ठेवल्यामुळे विषयाचं गांभीर्य जास्त वास्तव वाटतं. एखाद दुसरा प्रसंग वगळला तर इतर प्रसंग हे अत्यंत साधे सोपे आणि सहज कुठेही घडणारे वाटतात, हे विशेष. त्यामुळे चित्रपट बघताना आपणही या मुलांच्या विश्वात रमतो, त्यांच्याशी एकरूप होतो आणि त्यांना पडत असणाऱ्या प्रश्नांवर आपल्यालाच विस्मय वाटायला लागतो. हे सगळं आपल्या दिग्दर्शनातून दाखवणाऱ्या निपुण धर्माधिकारी यांचं विशेष अभिनंदन करावं लागेल. थोडक्यात, बऱ्याच काळापासून एक चांगला, आशयघन संहिता आणि रंजक मांडणीचा चित्रपट म्हणून धप्पा आवर्जून पाहावा असा आहे. कारण, छोट्यांचं नाटक सादर करताना ही मुलं मोठी गोष्ट सांगून गेली आहेत. आजची पिढी ही स्मार्टफोनच्या आहारी गेल्याची ओरड होत असताना लहान मुलांमध्ये असणारी संवेदनशीलता मनाला सुखावून जाते आणि मनातल्या त्यांच्याबद्दलच्या पूर्वग्रहांना चांगलाच ‘धप्पा’ बसतो.

पाहा धप्पाचा ट्रेलर-