
>>वैष्णवी कानविंदे-पिंगे
समाजात अनेक मोठे प्रश्न असतात, किंबहुना दररोज काही ना काही घटना घडतात. बातम्यांमध्ये आपण ते वाचतो आणि त्या घटनांवर आपण चर्चा करतो. त्यावर उकल कशी काढायची यावर मोठमोठ्या गोष्टी करतो. सुधारणेसाठी अमकं झालं पाहिजे, तमकं केलं पाहिजे असे एक ना अनेक विचार आपल्या मनात येतात, पण नंतर ते विसरूनदेखील जातो. सिस्टीमच्या विरुद्ध आपण काय करणार हा एक सर्वसाधारण दृष्टिकोन, पण जर आपण कट्ट्यावर बसून जे बोलतो किंवा समाजात घडणार्या कुप्रकारांबद्दल आपण ज्या प्रकारे राग व्यक्त करतो, गुन्हेगारांना कशी शिक्षा केली पाहिजे याबद्दल तावातावाने भाष्य करतो ते भाष्य नुसतं भाष्य न राहता ते प्रत्यक्षात आलं तर…. पांढरपेशा माणसाच्या मनातला उफाळणारा राग त्याने प्रत्यक्षात आणला तर… अशा सध्या काल्पनिक तरीही रंजक कल्पनेला साकारणारा सिनेमा म्हणजे मी शिवाजी पार्क.
हा सिनेमा इथपासून इतिपर्यंत अतिशय रंजक आहे. त्यातल्या घटना, त्यातले उपाय हे वास्तववादात शक्य नसतीलही, पण त्या रंजकतेत मात्र कुठेही कमी नाही. हा सिनेमा पाहताना आपल्या चेहर्यावरही नकळत समाधान येतं. कदाचित आपल्या प्रत्येकाच्या मनातला राग व्यक्त होताना यात दिसतो म्हणूनही असेल कदाचित…. पण मी शिवाजी पार्क हा वेगळा आणि रंजक प्रयत्न आहे हे नक्की.
शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर मॉर्निंग वॉकला येणारे पाच मित्र. त्या पाचही जणांचे स्वभाव वेगवेगळे. त्यांचे दृष्टिकोन वेगवेगळे. सगळ्यांनी आपापल्या आयुष्यात खूप काही कमावलेलं असतं. निवृत्तीनंतर सिस्टीमवर ताशेरे ओढत कधी खंत व्यक्त करत, वाद घालत ते इतरांप्रमाणे आयुष्य ढकलत असतात. अशातच एक दिवस समाजात एक घटना घडते. ती घटना सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनलेली असते आणि अशातच त्या घटनेवर संताप व्यक्त करत असताना लक्षात येतं की, ती घटना त्यांच्याशी निगडित आहे आणि मग त्या घटनेवर नुसता विचार करण्यापेक्षा काहीतरी ठोस पावलं उचलायचं ठरवतात. काय असते ती घटना आणि त्यावर हे पाचजण काय पावलं उचलतात, त्यांच्या प्रयत्नांना यश येतं का, ते जे करतात ते कसं करतात अशा रहस्यमय घटनांचा उलगडा सिनेमा पाहताना होतो.
एकाहून एक तगडे कलाकार हे या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. विक्रम गोखले, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, शिवाजी साटम, शरद पोंक्षे, उदय टिकेकर असे कलाकार आहेत. त्याशिवाय लेखक, दिग्दर्शक महेश मांजरेकर त्यामुळे असा सिनेमा कुठच्याही विश्लेषणाशिवायही एवढ्या तगड्या टीमला एकत्र पाहण्यासाठी म्हणून कोणत्याही मराठी प्रेक्षकाला पहावासा वाटेलच. या सिनेमात घटना आहे, त्यावरचं नाट्य आहे पण त्या नाट्यात काल्पनिकता जास्त आहे, पण पेक्षकाला असं खरंच होऊ शकतं का असा एक आशावाद मनात नक्की डोकावतो आणि या सगळ्यांनी चोख काम केलंय. अशोक सराफनी उभा केलेला रांगडा पोलीस असो, विक्रम गोखलेंनी साकारलेला माजी न्यायाधीश असो, शिवाजी साटमांचा पारसी बावा असो, गांधीवाद जपणारे दिलीप प्रभावळकर असोत किंवा सरळमार्गी आयुष्य जगणारे सतीश आळेकर, सगळ्यांनी मस्त आणि सहज काम केलंय. प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र शैली. ही जुगलबंदी पाहायला मजा येते. अशोक सराफांचं काम तर जबरदस्तच.
सहज, हलके फुलके आणि नेमके संवाद यामुळे सिनेमा खुसखुशीत झालाय. या सिनेमात मुख्य कलाकारांची फौज आहेच, पण इतरही बरेच कलाकार आहेत, पण या मुख्य कलाकारांमुळे इतर कोणाला फारसा वाव मिळतच नाही. त्यातल्या त्यात दीप्ती लेले वगळली तर बाकीचे बहुतेक सगळ्यांची नुसती गर्दीच जाणवते. त्यापुढे उल्लेख करावा असं काहीच नाही. दिग्दर्शन छान आहे. खिळवून ठेवणारे प्रसंग, खुशखुशीत वातावरण निर्मिती आणि प्रत्येक क्षणी असणारं नाट्य यामुळे हा सिनेमा करमणूक नक्कीच करतो. शेवटच्या प्रसंगात नृत्य सादर करणार्यांचा विचार कसा केला नाही वगैरे सारखे छोटे छोटे लॉजिकल प्रश्न बर्याच ठिकाणी उपस्थित होतात किंवा प्रसंग घडताना जी सहजता आहे ती पण थोडी खटकते. प्रकाश योजनादेखील जरा अधिक चांगली होऊ शकली असती, पण तरीही हा सिनेमा या सिनेमाचं एक खास उद्दिष्ट आहे. याच्या कथेने एका सामान्य माणसाच्या फँटॅसीला खुलवायचा प्रयत्न केलाय आणि त्यादृष्टीने यातले प्रसंग घडवले आहेत असा विचार केला तर सिनेमा नक्की उत्सुकता वाढवतो.
या सिनेमात एक भव्य कल्पना आहे. आपल्या मनात चाललेले जर प्रत्यक्ष उतरवलं तर काय घडू शकतं याचं एक चित्र उभं केलंय. वास्तववाद जरी नसला तरी असं वास्तवात झालं असतं तर काय? असा एक प्रश्न मनात नक्की येतो. रंजकतेसाठी आणि उत्तम कलाकारांची जुगलबंदी पाहण्यासाठी हा सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही.
दर्जा : ***
सिनेमा : मी शिवाजी पार्क
निर्माता : दिलीपदादा साहेबराव पाटील, सिद्धार्थ केवलचंद जैन
लेखक, दिग्दर्शक : महेश मांजरेकर
छायांकन : करण रावत
संगीत : अजित परब
कलाकार : विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर,
शिवाजी साटम, दीप्ती लेले, संतोष जुवेकर, शरद पोंक्षे, उदय टिकेकर.

























































