
>> क्षितिज झारापकर
‘संत तुकाराम’ आणि ‘आपट्याची पानं’… दोन वेगळ्या धाटणीच्या कलाकृती. संतोष पवारने ‘संत तुकाराम’चा गंभीर बाज पेलला आहे, तर दुसरी कलाकृती वाचिक अभिनयाने परिपूर्ण आहे.
सध्या मराठी रंगभूमी मंथनाच्या काळात आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी तद्दन व्यावसायिक नाटक कंपन्यादेखील या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करू पाहताहेत. अलीकडेपर्यंत केवळ विनोदी संहितांवर फोकस करून चालणार्या या कंपन्या आता आशय आणि विषयाची विभिन्नता शोधताना दिसताहेत. हे वातावरण नाट्यसृष्टीला पोषक आणि समृद्ध करणारंच आहे. या मंथनातून मराठी रंगभूमी अधिक ठाशीव होऊन निघेल यातही शंका नाही. पण जशी निर्मात्यांनी आणि रंगकर्मींनी प्रयोगशील होण्याची तयारी दाखवत या वाटचालीला सुरुवात केलेली आहे तशीच आता प्रेक्षकांनीही या मंथनाचा अनुभव घेण्याची तयारी दाखवायला हवी. पण त्यासाठी हे प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. म्हणूनच आज येथे दोन वेगळय़ा कलाकृतींवर भाष्य करण्याचे योजिले आहे.
यापैकी पहिली कलाकृती आहे मनाहेर नरे यांनी सुरू केलेल्या ‘ॐ नाट्यगंधा’ या संस्थेने सादर केलेलं ‘संगीत संत तुकाराम’ हे नाटक. खरं तर हे नाटक नारायणराव बालगंधर्व गंधर्व नाटक मंडळीतर्फे करणार होते, पण काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. 1912 साली हे नाटक बाबाजीराव राणे यांनी स्वतः स्थापन केलेल्या राजापूरकर नाटक मंडळीसाठी लिहिले व सादर केले. पुढे गणपतराव जोश्यांनी याचे प्रयोग केले. ‘ॐ नाट्यगंधा’च्या आजच्या सादरीकरणाचं दिग्दर्शन संतोष पवार यांनी केलेलं आहे. शंभर वर्षं जुनं नाटक करणं हे तसं अवघड काम आहे. संतोषने मात्र हे आजच्या प्रेक्षकाला भावेल अशा पद्धतीने उभं करण्याचा सलग प्रयत्न केलेला आहे. संतोषची शाब्दिक कोट्या आणि स्लॅपस्टिक कॉमेडीच्या बाजापेक्षा संपूर्णतः वेगळा पिंड या नाटकाचा आहे. संतोषने हे जपून दिग्दर्शन केलेलं आहे. मुळात इतकं जुनं लिखाण असल्यावर ते आता रसिकांना कितपत रुचेल हा मोठा प्रश्नच असतो. पात्रांचा कल्पक वावर आणि रंगमंचाचा व्यापक वापर करून संतोषने ‘संगीत संत तुकाराम’ला आजची गती प्रदान करत हा प्रश्न सोडवला आहे. नावावरून जरी हे नाटक तुकारामावरचं वाटलं तरी मुळात हे नाटक बुवाबाजीच्या विषयावर आहे आणि म्हणून ते आजही समर्पक आहे.
‘संगीत संत तुकाराम’च्या प्रयोगात कलाकारांची कामगिरी खूप महत्त्वाची आहे. पारंपरिक भारदस्त नाटक सादर करणार्यांत ते असतंच. येथे तुंबाजीच्या भूमिकेत ज्ञानेश महाराव आहेत. या संगीत नाटकाची सांगीतिक धुरा महाराव हे बालगंधर्वांच्या शैलीतील विक्रांत आजगावकरांसोबत सांभाळतात. सुरेल आवाज आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्व याच्या जोरावर ते तुंबाजी उभा करतात. लीना पाळेकर यांची जिजादेखील तितकीच प्रभावशाली झाली आहे. रोहन पेडणेकरचा मंबाजी लक्षात राहण्यासारखा आहे. गोष्ट तुकाराम महाराजांची असल्याने या तीनही पात्रांना खूप महत्त्व आहे आणि तिघेही आपल्या भूमिकांना सार्थ न्याय देतात. ‘संगीत संत तुकाराम’मध्ये अर्थातच तुकाराम सर्वात महत्त्वाचे. येथे विक्रांत आजगावकर यांनी तुकाराम साकारले आहेत. हे गायक नट असल्याच्या शिताफीने सामोरे येतात. प्रीती तोरणे यांची रंभा, अमर पावसकर यांचा हिरोजी, मयूरेश कोटकरांचा पंडितराव आणि देव कांगणे यांचे शिवाजी महाराज या नाटकाला योग्य तो भारदस्तपणा प्रदान करतात.
सुनील देवळेकरांचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या मूळ चालीतली पदं आणि डॉ. राम पंडीत यांचं पार्श्वसंगीत हे नाटक अधिक रंजक बनवतात. एकूणच ‘ॐ नाट्यगंधा’तर्फे ज्ञानेश महाराव निर्मित ‘संगीत संत तुकाराम’ हे एक पारंपरिक पठडीतलं छान नाटक आहे.
नाटक : संगीत संत तुकाराम
निर्मिती : ॐ नाट्यगंधा
निर्माते : ज्ञानेश महाराव
लेखक : बाबाजीराव राणे
नेपथ्य/प्रकाश : सुनील देवळेकर
संगीत : मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर
पार्श्वसंगीत : डॉ. राम पंडीत
दिग्दर्शक : संतोष पवार
कलाकार : लीना पाळेकर, प्राप्ती बने, प्रीती तोरणे, श्रद्धा मोहिते, कुशल कोळी, रोहन पेडणेकर,
ज्ञानेश महाराव, अमर पावसकर, सुजित मेस्त्री, मयुरेश कोटकर, देव कांगणे, विक्रांत आजगावकर.
दर्जा : **1/2
दुसरी कलाकृती ही वाचिक अभिनयावर बेतलेली अत्याधुनिक पद्धतीची प्रायोगिक नाट्यकृती आहे. ‘आपट्याची पानं’ या सदरात आशुतोष आपटे वेगवेगळ्य़ा विषयांवर खुमासदार शैलीत आणि अत्यंत स्पष्ट शब्दांत व्यक्त होत. आता त्यांनी त्यांच्याच या लिखाणाचं एक वेगळं स्वरूप आपल्यासमोर आणलं आहे. मुळात हा नाट्यप्रयोग आहे, त्यामुळे यात अभिवाचन आहे आणि काही भागांचं सादरीकरणदेखील आहे.
‘आपट्याची पानं’ या प्रयोगाचं दिग्दर्शन स्वतः आशुतोष आपटे यांनीच केलेलं आहे. दिग्दर्शनात आपट्यांनी वाचनाची लय सांभाळली आहे. एखादा लेख वाचताना जो फ्लो आपल्या ठायी असतो, तो फ्लो ‘आपट्याची पानं’च्या संपूर्ण दोन अंकी प्रयोगात आपल्याला अनुभवता येतो. पाच कलाकारांनी मिळून सादर केलेल्या या कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते उच्चार. सादरीकरणातल्या सगळ्य़ांचेच उच्चार स्पष्ट आणि चपखल आहेत. विशेष उल्लेख करायला हवा तो आभा वेलणकर आणि राजन जोशी या दोघांचा. हे दोघे मुळात व्यावसायिक नाटकांतून कामं करीत असल्यामुळे त्यांच्या सादरीकरणात शब्दांच्या वजनाचा अभिनयदेखील डोकावतो. आशुतोष आपटे हे स्वतः याचे लेखक असल्याने योग्य तो भाव त्यांच्या सादरीकरणात येतोच. अनुराज राजाध्यक्ष, धर्मेश पटेल आणि कुलदीप गोर या तरुण मुलांनीही यथायोग्य सादरीकरण केलेले आहे. ‘आपट्याची पानं’ हा कार्यक्रम हातात स्क्रिप्ट धरून सादर केला जातो. तरीही हे आपल्याला कुठेही खटकत नाही हे या कार्यक्रमाच्या लेखकाचं आणि कलाकारांचं वैशिष्ट्य आहे.
कौशल इनामदार यांनी यातील नेमक्या प्रसंगांना यथार्थ संगीत साथ दिलेली आहे. कार्यक्रमाच्या पोतावर संगीत कुठेही वरचढ होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतलेली आहे. ऐश्वर्या पाठारे यांच्या ‘सीऊ बाय ऐश्वर्या’ या बुटीकने अत्यंत सूचक आणि सुबक अशी वेशभूषा ‘आपट्याची पानं’करिता केलेली आहे. ‘धर्मजम्’ या संस्थेतर्फे चारू मनोज जोशी यांनी ‘आपट्याची पानं’ हा एक वेगळा प्रयोग केल्याबद्दल त्यांचं कौतुक व्हायलाच हवं.
नाटक : आपट्याची पानं
निर्मिती : धर्मजम प्रस्तुत
निर्माते : चारू जोशी
संगीत : कौशल इनामदार
वेशभूषा : ऐश्वर्या पाठारे
लेखक–दिग्दर्शक : आशुतोष आपटे
कलाकार : आभा वेलणकर, राजन जोशी, आशुतोष आपटे, अनुराज राजाध्यक्ष, धर्मेश पटेल, कुलदीप गोर
दर्जा : ***






























































