रेल्वे स्थानकांच्या स्टॉल्सवरील वडापाव महागला, आता मोजावे लागणार 18 रुपये

रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर आता शेवपुरी, दाबेलीही मिळणार आहे. ट्रेनची प्रतिक्षा करताना नवीन खाद्यपदार्थांचा आनंद घेणाऱ्या प्रवाशांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. मुंबईकरांचा लोकप्रिय खाद्यपदार्थ असलेल्या  वडापावसाठी 13 रुपयांऐवजी 18 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रशासनाच्या सुधारित दरपत्रकानुसार वडापाव महागला आहे.

वाढत्या महागाईची झळ रेल्वे स्थानकांतील खाद्यपदार्थांना बसली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने सुधारित दरपत्रकाला मंजुरी दिली आहे. नवीन दर 1 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी 2021 मध्ये पश्चिम रेल्वेच्या स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांच्या दरात बदल करण्यात आला होता. वाढत्या महागाईमुळे स्टॉल्सचालकांनी खाद्यपदार्थांचे दर वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वेने दरवाढ करुन स्टॉल्सचालकांना दिलासा दिला. मात्र अचानक मोठी दरवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचवेळी लिंबू व कोकम सरबतचे दर 6 रुपयांवरुन 5 रुपये केले आहेत. मात्र, 200 मिलीलिटरऐवजी 150 मिलिलिटर सरबत मिळणार आहे.

भेळचे दरही वाढले!

सुधारित दरांनुसार, दाबेली 20 रुपये, चायनीज भेळ 30 रुपये, व्हेज हॉटडॉग 35 रुपये, व्हेज पफ 35 रुपये, शेवपुरी 45 रुपये आणि व्हेज चिज टोस्ट सँडविच 50 रुपयांत मिळणार आहे. या दरामध्ये नवीन खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी रेल्वेने मंजुरी दिली आहे.