भूमिपुत्रांचा मुद्दा उचलणाऱ्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला यश, पहिला आमदार निवडून आला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

25 ते 35 वर्षे वयोगटातील तरुण गोयंकरांचा पक्ष अशी ओळख निर्माण झालेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स या नव्या पक्षाने यंदा गोव्यात सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच या पक्षाची स्थापना झाली आणि यंदा या पक्षाचा एक आमदार देखील निवडून आला. एवढेच नाही तर अनेक मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांना 3000 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे रिव्होल्युशनरी गोवन्स हा आता गोव्यात एक राजकीय पक्ष म्हणून उदयास येत असल्याचे बोलले जात आहे.

या पक्षात मुख्यतः राज्यातील बहुजन समाजातील तरुणाचा समावेश आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला नोंदणी मिळाल्यानंतर त्यांना निवडणुकीसाठी फुटबॉल चिन्ह देण्यात आले. यंदा या पक्षाने गोव्यात 38 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील सेंट आंद्रे या मतदारसंघात या नवख्या पक्षाने सत्ताधारी भाजपला जबरदस्त धक्का दिला. या पक्षाचे विरेश बोरकर यांनी भाजपच्या फ्रान्सिस्को सिल्व्हेरा यांचा पराभव केला.

निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी, तुकाराम उर्फ ​​मनोज परब यांच्या नेतृत्वाखाली रिव्होल्युशनरी गोवन्स (RG) या राजकीय संघटनेने स्थानिक गोयंकारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठविण्यास सुरुवात केली होती. संघटनेचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काळे कपडे घातलेले तरुण गोव्याच्या रस्त्यावर फिरत होते. गोव्यात बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेले परप्रांतीय या संघटनेच्या निशाण्यावर होते. हे तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना याबद्दल माहिती देत होते.

भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय या मुद्द्यावर या पक्षाने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. या पक्षाच्या उमेदवारांमुळे केवळ भाजपच नव्हे, तर काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मतांवरही परिणाम झाला. ‘आम्ही ही जागा पैशांच्या ताकदीशिवाय जिंकली आहे. आमच्यासाठी ही खूप चांगली सुरुवात असून हा पक्ष आता विधानसभेत गोव्यातील स्थानिकांचा आवाज बनेल असं आम्ही वचन देतो’, असे साळीगाव येथील पक्षाचे उमेदवार रोहन कलंगुटकर यांनी सांगितले.

विरेश बोरकर यांच्या विजयानंतर पणजीतील आल्टिन्हो येथील मतमोजणी केंद्राबाहेर, तरुणांनी मोठा जल्लोष केला. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या फुटबॉलचे चिन्ह असणारे झेंडे फडकावत “उज्जो” (कोंकणी भाषेत आग) अशा घोषणा दिल्या.

गोवा विधानसभा निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवार जिंकून आले असून, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामध्ये कुर्टोरिमचे तिसऱ्यांदा विजयी झालेले आमदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांचा समावेश आहे. लॉरेन्को यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र अखेर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.बिचोलीम मतदारसंघात अपक्ष उमेदवार चंद्रकांत शेट्ये विजयी झाले असून, कोर्टालिम येथील अँटोनियो डायस हे देखील अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.