
राज्यातील खासगी शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला 28 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील शाळांमध्ये आरटीईच्या उपलब्ध जागांपैकी तब्बल 24 हजार 942 तर मुंबईत 4 हजार 205 जागा रिक्त राहिल्या असल्याने या जागांवर प्रवेश व्हावेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यातील सर्वच जिह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या जागा मोठया प्रमाणात रिक्त आहेत. त्यासाठी प्रतिक्षा यादीतील दुसऱया टप्प्यात प्रवेश देण्याची मुदत 21 जूनपर्यंत हाती. मात्र त्यानंतरही मोठया प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत आरटीई प्रवेशासाठी 341 शाळांमध्ये 6 हजार 451 जागा आहेत, त्या जागांवर आत्तापर्यंत 3 हजार 246 जागांवरच प्रवेश झाले असून उर्वरित अर्ध्या म्हणजे 3 हजार 205 जागा रिक्त राहिल्या आहेत. तर राज्यात अशीच परिस्थिती असून राज्यातील 9 हजार 86 शाळांमध्ये 1 लाख 906 आरटीई प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या त्यापैकी आत्तापर्यंत 76 हजार 964 जागांवर प्रवेश झाले असून उर्वरित 24 हजार 942 जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.






























































