
अंध असूनही की-बोर्डवर सफाईपणे हात फिरवणारा प्रथम राठोड… बासरीच्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारा तुषार… आणि आपल्या सुरेल सुरांनी उपस्थितांची मने जिंकणाऱया अली यांच्या नव्या कोऱया बॅण्ड पथकाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रिखब जैन यांनी नेत्रहीन बालकांच्या अंगी भरलेल्या कलेला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. नेत्रहीन बालकांनी सादर केलेल्या संगीत बॅण्डचे लोकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
महाराष्ट्र मानव अधिकार आयोग व न्यायविधी प्रकरण, मुंबईच्या सहकार्याने हेतू चॅरिटेबल ट्रस्टद्वारे एक प्रोग्रॅम बौना व दिव्यांग बच्चो के नाम या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती तसेच महाराष्ट्र मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष किशोर तातेड, न्यायमूर्ती एन. जे. जमादार, विजय आंचिलया या कार्यक्रमाला उपस्थित होते. अंध बालकांना स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जागेवरच असणाऱया 20 दिव्यांग व्यक्तींना रोख रुपये 3 हजार रुपयांची मदत हेतू ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. तसेच 300 हून अधिक लोकांना ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. सुमारे 300 कुटुंबांना मोफत अन्नधान्य देण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन रिखब जैन यांनी केले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून दान करणाऱया व्यक्तींचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम विनय छेडा, हीराभाई पटेल, धर्मेश मांडलिया, किरण फोफालिया, अनिल बाबेल, धवल धरोड यांच्या सहकार्याने पार पडला.
























































