
दर शनिवार, रविवारी ऋषिकेश गावडे अनाथ बालके किंवा गरजूंसाठी विविध उपक्रम राबवत असतात. हिवाळ्यामध्ये त्यांनी अनेक गरजू लोकांपर्यंत जेवणं, ब्लँकेट, उबदार कपडे पोहोचवले होते. खिसा रिकामा झाला तरी चालेल, पण समाजातील वंचितांना किमान एकवेळचे जेवण मिळालेच पाहिजे हा त्यांचा हेतू आहे.
हल्लीच्या काळात माणूस स्वतःच्या गरजा भागवत प्रत्येक गोष्टींच्या मागे धावत असतो, पण या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसालाच विसरू लागलाय. स्वतःसाठी तर सगळे जगतातच, पण समाजासाठी जगावं या भावनेने बांधलेले काही लोक आजही या समाजाचा घटक आहेत आणि ही काळाची गरज आहे. त्यांपैकीच एक ऋषिकेश गावडे.
आजकाल समाजसेवा सगळेच करतात, ऋषिकेश यांनी केलेली समाजसेवा ही फक्त सोशल मीडियावर लाईक आणि ह्यूज मिळवण्यासाठी नाही, तर एखाद्याच्या पोटाची खळगी भरून काढण्यासाठी, एका हिरमुसलेल्या चेहऱयावर हास्य आणण्यासाठी आहे. ऋषिकेश गावडे हे ठाण्यातील रहिवासी आहेत. त्यांनी 15 जानेवारी 2023 पासून ‘द होमलेस एड फाऊंडेशन’ची सुरुवात केली. मागासवर्गीय, गरीबांच्या पोटाची भूक भागवण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात. 17 मे रोजी ठाण्यातील डंपिंग ग्राऊंडजवळ त्यांनी अन्नदान केले. फ्राईड राईस, साबुदाणा वडा, दही, सामोसे, जलेबी, बटाटेवडे, फ्रुटी, केक्स अशा अनेक पदार्थाचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं. तेथील लोकांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. आपल्यासाठी कोणी इतकं काही करतंय हे त्यांच्यासाठी अनपेक्षित होतं. भूकेल्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऋषिकेश गावडे कायम झटत असतात.
– मानसी पिंगळे, म. ल. डहाणूकर कॉलेज