नद्या प्रदूषणमुक्त करणार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यांतील अनेक नद्यांमध्ये औद्योगिक सांडपाणी, रसायने सोडली जात असल्यामुळे त्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांमधील प्रदूषणाबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ आणि राज्यातील नद्या सांडपाणीमुक्त (झीरो डिस्चार्ज) करू, महाराष्ट्राला लवकरच प्रदूषणमुक्त करू, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत तारांकित प्रश्नोतराच्या तासाला सदस्य विलास पोतनीस यांनी नीरा नदी आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतीत होत असलेल्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. तालुका खंडाळा, जिल्हा सातारामधील शिरवळ येथील एसीजी असोसिएट कॅप्सूल्स या कंपनीने रसायनमिश्रित सांडपाणी परिसरातील शेती आणि नीरा नदीच्या पात्रात सोडले. त्यामुळे कंपनीवर कारवाई होणार का, शेतीचा पंचनामा करून नुकसानभरपाई दिली जाणार आहे का, कंपनीकडून नुकसानभरपाई वसूल करा, अशी मागणी पोतनीस यांनी केली. दरम्यान, कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून न्यायालयाचा निर्णय आल्यावर त्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

नाग, उजनी, नीरा, खांब, पंचगंगासह राज्यातील सर्व नद्यांमधून प्रदूषण रोखून ती सांडपाणीमुक्त करू. बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राला लवकरच प्रदूषणमुक्त करू, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सभागृहाला दिले.