बिहारमध्ये RJD नेत्याची निर्घृण हत्या; हॉटेलमध्ये घुसून घातल्या गोळ्या, विधानसभा निवडणूक लढण्याची सुरू होती तयारी

बिहारची राजधानी पाटणामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याची बुधवारी रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली. राजकुमार राय उर्फ अल्ला राय असे हत्या झालेल्या आरजेडी नेत्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली. चित्रगुप्त नगर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या राजेंद्र नगर टर्मिनल येथे ही घटना घडली.

एसपी परिचय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र नगर टर्मिनल जवळील लेन नंबर 17 येथे रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव राजकुमार राय उर्फ अल्ला राय आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून या प्रकरणात आणखी काही गुन्हेगार सामील असण्याची शक्यता आहे.

राजकुमार राय हे राजकारणात सक्रीय होते आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहारही करत होते. घटनास्थळावरून पोलिसांनी काडतुसाच्या 6 पुंगळ्या जप्त केल्या आहे. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहे, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हल्लेखोर राजकुमार राय यांच्या घराबाहेर घात लावून बसले होते. रात्रीच्या सुमारास त्यांची गाडी घराबाहेर पोहोचताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्यानंतर रायकुमार यांनी जवळच्याच एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला, मात्र हल्लेखोरांनी त्यांना गाठत त्यांच्यावर अनेक राऊंड फायर केले. यातील एक गोळी हॉटेलच्या फ्रिजलाही लागली.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजकुमार यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर 8 ते 10 गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मयताची बहीण शिला देवी यांनी राजकुमार विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत होते अशी माहिती दिली.