बोरिवलीतून समुद्रमार्गे रो-रो सेवा सुरू होणार, 12 कोटींच्या खर्चास मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढती वाहतूककोंडी, इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी मुंबईच्या किनारपट्टीवर जलवाहतूक सुरू करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टय़ा रो-रो सेवेने जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबईच्या पश्चिम उपनगरात बोरीवलीत रो-रो जेटीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. रो-रो सेवा लवकरच सुरू करण्यासाठी आता या जेटीवर प्रवासी टर्मिनल, कार पार्पिंग व अन्य आवश्यक पायाभूत सुविधांसाठी 11 कोटी 99 लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राला सुमारे 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनारपट्टीवरील बंदरे आणि खाडय़ांमधून दरवर्षी सुमारे  दोन कोटी प्रवासी बोटीने प्रवा, करतात. जलवाहतुकीचा पर्याय हा किफायतशीर, वेळेची व इंधनाची बचत करणारा आहे. त्यामुळे प्रदूषणातही घट होते. एकीकडे मुंबईचा विस्तार अगदी पालघर, अलिबागपर्यंत वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा शहरामधील दिवसेंदिवस वाहतूककोंडी वाढत आहे. त्यामुळे मुंबईच्या किनारपट्टीवर जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर एलिफंटा, जेएनपीए अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबईत सुमारे 8.37 कोटी रुपये खर्च करून प्रवासी जेटी बांधण्यात आली आहे. त्यासाठी पेंद्र व राज्य सरकार 50-50 टक्के निधी देणार आहे.

विविध मार्गांवर 34 प्रकल्प

राज्यात जलवाहतुकीला चालना देण्यासाठी ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत सुमारे 1 हजार 133 कोटी रुपयांचे तब्बल 34 प्रकल्प आखण्यात आले आहेत. त्यात मुंबईची पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा-भाईंदर परिसरात जलवाहतूक सुरू करण्यात येत आहे. वसई, ठाणे-कल्याण या भागात जलवाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात भाईंदर, कोलशेत, काल्हेर व डोंबिवली या चार ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने जेटी व इतर सुविधांसाठी 119 कोटी 38 लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट’कडून  पर्यावरणाचे ना हरकत प्रमाणपत्रही दिले आहे.

रेडिओ क्लबची जेटी तीन वर्षांत

गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातील रेडिओ क्लबजवळ नवीन प्रवासी जेट बांधण्याच्या दृष्टीने 162 कोटी 20 लाख रुपयांचा प्रकल्प आखण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांत ही जेटी पूर्ण करण्याची योजना आहे. या जेटीचे काम पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबई ते मांडवा, एलिफंटा, जेएनपीएशी बोटीने सेवा जोडली जाईल. त्याशिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ही शहरे मुंबईशी जोडली जातील.

पर्यावरणस्नेही व महागडी

जलवाहतुकीचा पर्याय हा पर्यावरणपूर्वक, आरामदायी व किफायतशीर असल्याचे मेराटाईम बोर्डाच्या प्रस्तावात नमूद केले आहे. मध्यंतरी मुंबई क्रूझ टर्मिनस ते मांडवा अशी वॉटरटॅक्सी सुरू करण्यात आली होती, पण प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी ही जलवाहतूक बंद पडली.