कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर एसटी-कारची धडक; चौघांचा मृत्यू ,तीनजण जखमी

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कळंबे (ता.करवीर) येथील ओढ्याजवळ कार आणि एसटी बसची धडक झाली. या अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अक्काताई दिनकर माळवे ( वय 65), संजय दिनकर माळवे (44), करण दीपक माळवे (27) आणि पुजा संजय माळवे (36 ,सर्व.रा.विक्रमनगर,कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला.

कळे येथील नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी माळवे कुटुंबीय कारने निघाले होते. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे येथील ओढ्याजवळ समोरील दिशेने कणकवलीहून कोल्हापूरकडे येणाऱ्या एसटी बसला त्यांची कार धडकली. या भीषण अपघातात गाडीतील अक्काताई माळवे,संजय माळवे व करण दीपक माळवे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पुजा माळवे यांना रुग्णालयात नेताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या