
गेल्या आठ महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील रस्ते अपघातात तसेच अपघातात मृत्यूमुखी पडणाऱयांच्या संख्येत घट झाली असून पादचारी आणि दुचाकीस्वार हे रस्त्यावर सर्वाधिक प्रमाणात आढळून आल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
‘ब्लुमबर्ग फिलार्थेपिस इनेशिटिव्ह फॉर ग्लोबर रोड सेफ्टी’(बीआयजीआरएस) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या पाच वर्षांत रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येत 27 टक्क्यांनी घट झाली. मात्र रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱयांमध्ये 20 ते 29 वयोगटातील तरुणांची संख्या जवळपास 80 टक्के इतकी आहे. या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत 172 रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मृत्यूचा हा आकडा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. तर पादचारी आणि दुचाकीस्वार हे रस्त्याच्या सर्वाधिक वापर करीत असल्याचेदेखील निष्पन्न झाल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.
सायंकाळी सहा ते नऊ धोकादायक वेळ
सायंकाळी सहा ते रात्रौ नऊदरम्यानची वेळ घातक असल्याचे उघडकीस आले आहे. कारण या वेळेला वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असल्याने अपघातदेखील जास्त झाल्याचे आढळून आले. त्यात मृत्यू आणि जखमी होणाऱयांची संख्या जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. आल्याचे वाहतूक शाखेचे सहआयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले.

































































