ठाण्यात शिवसेनेचा दणदणीत रोड शो; प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही महाविकास आघाडीचाच आवाज

पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी काही तासांचा अवधी उरलेला असताना ठाण्यात आज महाविकास आघाडीचा आवाज घुमला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचा दणदणीत रोड शो पार पडला. ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘अमर रहे अमर रहे, आनंद दिघे अमर रहे’, ‘शिवसेना झिंदाबाद’ या घोषणेने आज ठाणे दणाणून गेले.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजन विचारे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण ठाण्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळाला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर नतमस्तक होत रॅलीत सहभाग घेतला. महागिरी मोहल्ला, सिडको, चेंदणी कोळीवाडा, अष्टविनायक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोपरी गाव, आनंदनगर, गांधीनगर, परबवाडी, वागळे चेक नाका, रोड नंबर 16, किसननगर, आयटीआय सर्कल, जय भवानी नगर, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर नाका, नितीन कंपनी, लुईसवाडी, बी केबिन, महापालिका चौक, चंदनवाडी, राबोडी, वृंदावन सोसायटी, काशिनाथ घाणेकर, घोडबंदर, बाळकुम, गोकुळनगर, मीनाताई ठाकरे चौक, उथळसर, टेंभीनाकामार्गे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मिंधे गट धास्तावला
राजन विचारे यांनी सुरुवातीपासून ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचार रॅलींना आणि सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्या तुलनेत मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचाराऐवजी मोठी फजितीच झाली आहे. त्यांचा संपूर्ण कालावधी नाराजांची मनधरणी करण्यात गेला आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजन विचारे यांच्या प्रचार रॅलीचा प्रतिसाद पाहून मिंधे गट आणि भाजपवाले धास्तावले आहेत.