आदित्य ठाकरे यांचा शब्द खरा, संपर्क तुटलेल्या 25 गावांची वाट शिवसेनेमुळे सुकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

सरकारची मदत येईल तेव्हा येईल मात्र शिवसेना नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा हा शब्द खरा ठरवत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी कळमनुरी तालुक्यातील सांडस, सालेगाव व परिसरातील पंचवीस गावांसाठी स्वखर्चातून पुलाची दुरुस्ती सुरू केली आहे. जेसीबी मशीन व डिझेलचा खर्च देऊन खचलेल्या पुलाची दुरुस्ती शिवसेनेकडून केली जात असल्याचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले. यामुळे नागरिकांची वाट सुकर झाली आहे.

मागील चार दिवसापूर्वी सतत दोन दिवस झालेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे कळमनुरी तालुक्यातील सांडस, सालेगाव, जवळा पांचाळ या परिसरातील 35 गावांचा संपर्क सुटला होता. कळमनुरीहुन सांडस, सालेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढा व नाल्यावर असलेले पूल खचले होते. त्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला. सालेगाव परिसरातील तब्बल 25 गावांचा तीन दिवसांपासून कळमनुरी या तालुक्याच्या ठिकाणापासून संपर्क बंद झाला होता. जनआर्शिवाद यात्रेच्या निमित्ताने कळमनुरीत आलेले शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना नागरिकांनी ही अडचण सांगितली. शिवसेना खासदार हेमंत पाटील यांना याबाबत लक्ष घालण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी केली होती. खासदार हेमंत पाटील यांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी व लोकसभा सहसंपर्कप्रमुख रमेश शिंदे यांनी सांडस, सालेगाव येथे जाऊन खचलेल्या पुलाची पाहणी केली. सरकारी यंत्रणा तीन दिवसापासून हलली नाही. प्रशासनाकडून बेफिकिरी दाखवत दुर्लक्ष होत असताना जिल्हाप्रमुख बांगर हे आज पुन्हा शिवसैनिकासह पुलावर पोहोचले. शिवसेनेच्या वतीने जेसीबी व डिझेल खर्च देऊन या पुलाच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या या कार्यतत्पर भूमिकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून उद्या 6 ऑगस्टपासून पूर्ववत हा मार्ग नागरिकांना रहदारी साठी उपलब्ध होईल असे संतोष बांगर यांनी दैनिक सामना शी बोलताना सांगितले.