Mumbai crime news – घाटकोपरमध्ये घरफोडी करणारा चोरटा शेतात सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर पूर्वेकडील जय अरिहंत सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये हातसफाई करून सांगलीत जाऊन लपलेल्या सराईत चोराच्या पंतनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शेतात घर बांधून तेथे तो लपून राहत होता.

10 सप्टेंबरच्या दुपारी जय अरिहंत सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 16 मध्ये चोरीची घटना घडली होती. चोराने घरातील 6 लाख 9 हजार रुपये किमतीचे 197 ग्रॅम सोने चोरून नेले होते. हा प्रकार कळताच घर मालक कोठारी यांनी पंतनगर पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर खोंद्रे व पथकाने तपास सुरू केला. पथकाने सीसीटीव्ही तपासले असता आरोपी एका गाडीने सांगलीच्या दिशेने पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सांगली गाठून आरोपीचा शोध घेतला. तेव्हा आरोपी शेतात बांधलेल्या घरात राहतो व त्याने घराच्या चहूबाजूने सीसीटीव्ही लावलेत. पोलीस आल्याची कुणकुण लागताच तो पसार झाला होता. शिवाय त्याने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला होता. मात्र तरीही पंतनगर पोलिसांनी त्याच्या हालचालीवर करडी नजर ठेवली. तो घरी परतल्याचे कळताच चहू बाजूने पोलिसांनी गराडा घालून लोकेश सुतार (29) याला पकडले. लोकेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात 20 हून अधिक गुह्यांची नोंद आहे. त्याच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.