विसर्जन मिरवणुकीत चोरांची हातसफाई, शेकडो पर्स, मोबाईल, सोन्याचे दागिने चोरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लालबाग, गिरगाव परिसरात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. याच गर्दीचा गैरफायदा उचलत चोरांनी आपले हात साफ केले. भाविकांची रेटारेटी होत असताना चोरांनी अनेकांचे मोबाईल तसेच सोन्याच्या चेन, मंगळसूत्र, पर्स चोरल्याच्या घटना घडल्या.

मुंबईचा राजा, लालबागचा राजा, नरेपार्कचा राजा, तेजुकायाचा राजा-चिंतामणीच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी लालबाग परिसरात सालाबाद प्रमाणे यावेळी देखील तोबा गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा भाविक मोठय़ा संख्येने होते. त्या गर्दीत घुसून चोरांनी नागरिकांच्या खिशांना लक्ष केले. अनेकांचे मोबाईल चोरले, काहींचे पाकिट मारले, तर बऱयाच जणांच्या सोनसाखळ्या चोरल्या, महिलांचे मंगळसूत्र देखील शिताफीने काढून नेण्यात आले. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान लालबाग परिसरात 150 हून अधिक पर्स, मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. तर वि.प.रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दहा दिवसांच्या कालावधीत 120 सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले. याशिवाय विसर्जन मिरवणुकीत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल, पर्स चोरीचे किती गुन्हे घडले ते समजू शकले नाही.