
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मनी लॉण्डरिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वाड्रा यांना दिल्ली न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी पाच लाख रुपयांचा वैयक्तिक बॉण्ड आणि तेवढय़ाच रकमेची हमी या अटींवर रॉबर्ट वाड्रा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, असे न्यायालयाने वाड्रा यांना बजावले आहे.
याशिवाय कोणताही पुरावा नष्ट करू नये, मनी लॉण्डरिंग प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव टाकू नये, असे वाड्रा यांना न्यायालयाने सुनावले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे असलेले रॉबर्ट वाड्रा यांच्यावर लंडन येथील ब्रायटन स्क्वेअर येथे 1.9 दशलक्ष पौंडाची मालमत्ता मनी लॉण्डरिंगद्वारे खरेदी केल्याचा आरोप आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे रॉबर्ट वाड्रा हे पती आहेत.
























































