रोबोट विकतोय चटपटीत पाणीपुरी, लॉकडाऊनमध्ये बनवली अनोखी मशीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणीपुरी खाणं कुणाला आवडत नाही. असं असले तरी पाणीपुरी खाताना ‘हायजिन’चा विचार मनात येत राहतो. पण आता चिंता नको. कारण दिल्लीतील एका व्यक्तीने ‘कॉन्टॅक्टलेस’ पाणीपुरी खाता येईल अशी रोबोटीक मशीन तयार केलीय. पैसे देण्यापासून पाणीपुरीचे वाटप करण्यापर्यंत ही मशीन पूर्णपणे संपर्कविरहित पद्धतीने काम करते.

पाणीपुरीची मशीन तयार करणाऱया व्यक्तीचे नाव गोविंद आहे. ‘फूडी विशाल’ हा फूडब्लॉगरने मशीन कशी काम करते याचा व्हिडीओ तयार केलाय. त्याला लोकांची भरभरून पसंती मिळत आहे. मशीनच्या किमतीवर पाणीपुरी आणि वडापावच्या किमती दिलेल्या आहेत. त्याचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट करायचे. पेमेंट झाल्यावर पाणीपुरीचे बंद बॉक्स ग्राहकाला मिळतो. या बॉक्समध्ये एक ग्लास आहे. ग्लासामध्ये आपण गोड, तिखट, हिंग आणि मिक्स असे वेगवेगळ्या चवीचे पाणी घेऊ शकतो.

गोविंद हा रोबोटिक्स इंजिनीयर असून दिल्लीमध्ये सायबर कॅफे चालवतो. 2018 पासून तो मशीन तयार करण्याचे काम करत होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये त्याला वेळ मिळाला आणि त्याने मशीनवर लक्ष केंद्रित केले. मार्च 2021 मध्ये मशीनचे टेस्टिंग करण्यासाठी ती लाँच करण्यात आली होती. त्यावेळीच गोविंद यांना मशीनच्या ऑर्डर मिळाल्या. त्यानंतर आता मशीनचे व्यावसायिक व्हर्जन आणले आहे. सध्या पाणीपुरीची रोबोटवाली मशीन दिल्लीमध्ये दोन ठिकाणी पहावयास मिळेल.