रॉकगार्डन भागात मानवी अवशेष, मालवणातील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह असल्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण रॉकगार्डन समुद्री खडकाळ भागात रविवारी सकाळी मानवी मृतदेहाचे अवशेष दिसून आले. हे अवशेष चार दिवसांपूर्वी रॉक गार्डन येथून बेपत्ता झालेल्या काव्या माजिक हिचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शोध पथकाच्या स्कूबा डायव्हर्सनी अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भरती असल्याने खडकाळ भागात अडकलेले अवशेष बाहेर काढणे शक्य झाले नाही. सोमवारी सकाळी ओहटी वेळी पाणी कमी झाल्यावर अवशेष बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे आपत्कालीन ग्रुपच्या स्कूबा डायव्हर्संनी स्पष्ट केले.

रॉकगार्डननजीकच्या समुद्रात खडकाळ भागात एक मानवी अवशेष आढळून आल्याची माहिती मिळताच काव्या हिचा पती कृष्णा माजिक, मेहुणा तसेच अन्य मित्र परिवार घटनास्थळी दाखल झाला होता. मालवण शहरातील रेवतळे येथे राहणारी काव्या कृष्णा माजिक (21, मूळ रा. दोडामार्ग) ही विवाहिता 8 एप्रिलला रॉकगार्डन येथून बेपत्ता झाली होती. तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. गेले तीन दिवस तिचा समुद्रात शोध सुरू होता. आज सकाळी रॉकगार्डन येथील समुद्रात खडकाळ भागात स्कूबा डायव्हर्सकडून शोध सुरू असताना खडकाळ भागातील एका ढोलीत एक अवशेष दिसून आला. स्कूबा डायव्हर्संनी त्याठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र समुद्री लाटांचा मारा या भागात होत असल्याने तेथपर्यत स्कूबा डायव्हर्संना पोचणे कठीण बनले होते. खडकाळ भागात दिसून आलेला अवशेष मानवी पाय असल्याचे दिसून आले. अन्य अवशेष याच ढोलीत अन्यत्र अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, विलास टेंबुलकर हे करत आहेत.

चार दिवसांपूर्वी रॉकगार्डन येथून बेपत्ता झालेल्या काव्या माजिक हिचाच हा अवशेष असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पूर्ण मृतदेह सापडला नसल्याने तो नेमका कोणाचा हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ज्या ठिकाणी हा अवशेष दिसून आला त्या खडकाळ भागात ढोली (पोकळ खडकाळ भाग) आहे. तेथपर्यत स्कूबा डायव्हर्संना पोचणे कठीण असल्याने जोपर्यंत भरती कमी होत नाही तोपर्यंत वाट पाहावी लागेल असे स्कूबा डायव्हर्संनी स्पष्ट केले. सकाळी खडकाळ भागात अडकलेले अवशेष बाहेर काढण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.