
ग्रेटर नोएडातील गोंडा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या एका 30 वर्षीय तरुणावर मगरीने हल्ला करून त्याला खोल पाण्यात खेचून नेल्याची धक्कादायक घटना गोंडा जिल्ह्यातील सरयू नदीच्या घाटावर घडली आहे. दीपक शर्मा असे या तरुणाचे नाव आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मूळचा ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेला दीपक शर्मा हा आपली सासू उर्मिला देवी यांच्या निधनामुळे गोंडा जिल्ह्यातील उमरी गावात आला होता. बुधवारी दुपारी सनौली मोहम्मदपुर उदयभान पाही जवळील सरयू नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. दीपक नदीच्या घाटावर चिता रचण्यासाठी खड्डे खोदणे आणि खूंट ठोकण्याचे काम करत होता. हे काम आटोपल्यानंतर तो नदीच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरला. त्याने पाण्यात पहिली डुबकी मारलीच होती, तेवढ्यात नदीतून बाहेर आलेल्या एका महाकाय मगरीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. मगरीने दीपकचे डोके आपल्या जबड्यात पकडले आणि अत्यंत वेगाने त्याला खोल पाण्याच्या दिशेने खेचून नेले.
हा प्रकार पाहून नदीकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा घराचा जावई असल्यामुळे उपस्थित सर्वांनीच त्याला अंत्यसंस्कारासाठी लागणारी मदत करण्यापासून थांबवले होते. मात्र मात्र त्याने कोणाचे ऐकले नाही आणि दीपकसोबत अशी अघटीत घटना घडली. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत सासू उर्मिला देवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि महसूल विभागाच्या पथकाने बोटीच्या साहाय्याने नदीत दीपकचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र उशिरापर्यंत त्याचा काहीही पत्ता लागू शकला नाही. अंधार झाल्यामुळे बुधवारी संध्याकाळी ही शोधमोहीम थांबवावी लागली होती.
उमरी बेगमगंजचे ठाणे प्रभारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीचा प्रवाह आणि मगरीचा वावर लक्षात घेता लखनऊहून एसडीआरएफच्या (SDRF) विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या पोलीस प्रशासन, स्थानिक लोक आणि कुटुंबातील सदस्य नदीकिनाऱ्यावर उपस्थित असून, एसडीआरएफच्या टीमच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे. अद्याप दीपकचा मृतदेह हाती लागलेला नाही.
























































