
तासगाव तालुक्यातील आठ आणि कवठेमंहाकाळ तालुक्यातील नऊ गावांचा ‘टेंभू योजने’त समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने काढावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमन पाटील व पुत्र रोहित पाटील यांनी आज कार्यकर्त्यांसह सांगली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला काँगेसचे विशाल पाटील यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, दुपारनंतर रोहित पाटील यांची प्रकृती ढासळली. त्यांना 102 ताप होता. तरीही ते आंदोलनावर ठाम होते.
यावेळी रोहित पाटील यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता टीका केली. ‘राजकारण जरूर करा, पण पाण्यासाठी राजकारण करण्याची प्रवृत्ती आमची नाही. गावांना पाणी मिळावे यासाठी यापूर्वी स्व. आर. आर. पाटील यांनी आणि आबांच्या निधनानंतर सुमनताई या आमदार झाल्यानंतर सरकारशी केलेला पत्रव्यवहार पाहायचा असेल तर सर्व पुरावे देतो. मात्र, आमच्या विरोधकांनी गेल्या नऊ वर्षांत जिह्याच्या विकासाचे कोणते काम केले हे एकदा जनतेला सांगावे,’ असे आव्हान रोहित पाटील यांनी दिले.






























































