
बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, डिग्री उत्तीर्ण होऊनही बेरोजगार असलेले उमेदवार, नोकरभरतीतील कंत्राटी पद्धत अशा तरुणांच्या प्रश्नांसाठी 24 ऑक्टोबरपासून पुणे ते नागपूर 820 किलोमीटरची पायी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात सुरू असलेल्या शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य तरुण वर्ग भरडला जात आहे. शासनाच्या धोरणांचा सर्कत्र विरोध होत असून तरुण वर्ग आंदोलने करीत आहे. राज्य सरकार मात्र राजकारणात व्यस्त आहे. तरुण वर्गाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. सरकार तरुण वर्गाला गृहीत धरत आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तरुणांच्या प्रश्नांसाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. दसऱयानिमित्त 24 ऑक्टोबरपासून पुण्यातून या पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रेत दररोज 24 ते 27 किलोमीटर पायी चालत जाणार आहोत. या पदयात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होऊन युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.