VVIP लोकांसाठी १४३ कोटींची तरतूद, सरकारची प्राथमिकता शेतकरी नसून मौजमजा आणि उधळपट्टी; रोहित पवारांची सडकून टीका

इंडिगो कंपनीचा भोंगळ कारभार साऱ्या देशाने पाहिला. मोठ्या प्रमाणात विामन उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवशांचा संताप झाला. मुंबईमध्ये रेल्वे पकडण्यासाठी जशी गर्दी होते, तशी अभुतपूर्व गर्दी विमानतळांवर झाली होती. एकीकडे नागरिकांची हेळसांड सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाहीये, अशी गंभीर परिस्थिती असताना सरकारने VVIP लोकांच्या हवाई प्रवासासाठी तब्बल १४३ कोटींची तरतूद केली आहे. आमची प्राथमिकता शेतकरी नसून मौजमजा आणि उधळपट्टी आहे, हे सरकारने सिद्ध केलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्वीटरवर पोस्ट करत शेतकरी कर्जमाफी, कृष्टी समृद्धी योजना, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांचा निधी, मनरेगाची थकलेली बिलं या सर्व प्रश्नांना हात घालत रोहित पवार सरकारवर बरसले आहेत. ते म्हणाले की, “एकीकडं २०१७ च्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, कृषी समृद्धी योजना, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत यासाठी निधी नाही, मात्र दुसरीकडं VVIP लोकांच्या हवाई प्रवासासाठी तब्बल १४३ कोटींची तरतूद करून सरकारने आमची प्राथमिकता शेतकरी नसून मौजमजा आणि उधळपट्टी आहे, हेच सिद्ध केलंय.” असं ते म्हणाले आहेत.

“राज्यात दररोज सरासरी ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत, मनरेगाची बिलं थकल्याने शेतकऱ्यांना सावकाराकडून पैसे घ्यावे लागतायेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या रखडल्या आहेत, बिलं रखडल्याने युवा कंत्राटदारांना आत्महत्या कराव्या लागतायेत, सारथी, बार्टी, महाज्योती सारख्या संस्थांना पुरेसा निधी नाही. अशा परिस्थितीत सरकारच्या पुरवणी मागण्या बघता सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नसल्यासारखंच सत्ताधारी वागत आहेत, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, “सरकारी यंत्रणा आणि जनतेचा पैसा फुकट मिळाल्यासारखं ओरबाडण्यापेक्षा सत्तेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.” असा खरमरील सल्ला सुद्धा रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.