
लवकरच आपले आघाडीचे सरकार सत्तेत येईल, पण यात हक्काची माणसं दुरावू नयेत असं व्यक्तिशः वाटतं’अशी भावनिक साद नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना घातली आहे. आजच्या घडामोडी पाहताना जुनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत आणि स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं, अशा शब्दांत रोहित पवार यांनी अजित पवार यांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी त्यांनी फेसबुकवरून अजित पवार यांना उद्देशून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसोबत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत स्वतः रोहित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दिसत आहेत.
फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय
लहानपणापासून साहेबांना पाहत आलो, प्रश्न राजकीय असो की कौटुंबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारेदेखील साहेबच होते. अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमिका घेणारे अजितदादादेखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकीय, खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही. आजच्या घडामोडी पाहताना जुनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांना साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणारदेखील नाही, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती ‘पवार साहेब’ होतो. सर्वसामान्यांचा आवाज होतो आणि अखेरपर्यंत लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पाहत आहेत. अशा वेळी कुटुंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत राहायला हवं. लवकरच आपले आघाडीचे सरकार सत्तेत येईल, पण यात हक्काची माणसं दुरावू नयेत असं व्यक्तिशः वाटतं




























































