सारवासारव… सावरासावर… टी-20 वर्ल्ड कपच्या निवडीबाबत कर्णधार-निवड समिती अध्यक्षांनी लढवला किल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हार्दिक पंडय़ाची निवड का केली… पंडय़ाला कर्णधारपदावरून का हटवलं… रिंकू आणि शुबमन गिलला का वगळलं…लो स्ट्राईक रेटनंतरही विराट कोहलीची निवड कशी… के.एल. राहुलला का बसवलं… शिवम दुबेला का निवडलं… अशा अनेक प्रश्नांबाबत सारवासारवीची आणि सावरासावरीची उत्तरे देत हिंदुस्थानी संघाच्या कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने पत्रकारांच्या प्रश्नांच्या हल्ल्यांना परतवत टी-20 वर्ल्ड कपच्या निवडीबाबत आपली बाजू मांडत किल्ला लढवला.

दोन दिवसांपूर्वी हिंदुस्थानी संघाची निवड आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड झाल्यानंतर काहींनी संघाला दमदार अशी उपमा दिली तर काहींनी संघातील काही खेळाडूंच्या निवडीबद्दल आक्षेप नोंदवला होता. एकाच वेळी सर्वांना न्याय देणे शक्य नसल्यामुळे काहींची निवड खटकणे स्वाभाविकच होते. त्या निवडीबाबत आपली मते मांडण्यासाठी आज खुद्द कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर समोर आले आणि त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.

हिंदुस्थानी संघात हार्दिक पंडय़ाची केलेली निवडच आजच्या पत्रकार परिषदेत जास्त गाजली. आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यानंतरही पंडय़ाला संघात कायम ठेवण्याचा जुगार निवड समितीने केला, पण त्याचबरोबर त्याला उपकर्णधारपदाचे बक्षीसही दिले. याबाबत छेडले असता रोहित म्हणाला, पंडय़ा फिट असेल तेव्हा संघात असावा, हे आमचं आधीपासूनच मत होतं. त्यामुळे त्याच्याबाबत मनात शंकाच येऊ शकत नाही. तर दुसरीकडे आगरकर म्हणाला, तो काय-काय करू शकतो, हे सर्व आम्ही जाणतो. त्याला कुणीही रिप्लेस करू शकत नाही आणि त्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध नाही. जो पंडय़ा करू शकतो ते शानदारच असते. आगरकरने तर पंडय़ाचा कौतुक सोहळाच साजरा करताना त्याच्या अपयशावर पडदा टाकून सारवासारव करण्याचा प्रयत्न करत त्याला अष्टपैलू चमक दाखवावीच लागेल, असा मुळमुळीत इशाराही दिला.

चार फिरकीवीरांचा सस्पेन्स राहू द्या

अमेरिका-विंडीजच्या खेळपट्टय़ांसाठी संघात चार-चार फिरकीवीर का निवडले आहेत, हे आता विचारू नका. याचे उत्तर तुम्हाला विंडीजमध्ये गेल्यावर मिळेल. मला स्वतःलाच संघात चार-चार फिरकीवीर हवे होते आणि पंडय़ाला अष्टपैलू म्हणून खेळवायचे आहे. रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल चांगली फलंदाजीही करू शकतात. कुलदीप आणि चहल हे दोघेही आक्रमक फिरकीवीर आहेत. जे आमच्या संघाला संतुलित करतात. त्यामुळे चार-चार फिरकीवीरांचा सस्पेन्स थोडा राहू द्या, असे खुद्द रोहित शर्माच पत्रकारांना म्हणाला आणि त्याने आपल्या फिरकीच्या चौकडीचे समर्थन केले.

शिवम दुबे काहीही करू शकतो…

आपले खेळाडू आयपीएलमध्ये जे करताहेत, तेच त्यांनी वर्ल्ड कपमध्येही करावे, हीच आमची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने शिवम दुबे आयपीएलमध्ये जास्त गोलंदाजी करू शकला नाही. मात्र तो असा खेळाडू आहे, जो अचूक गोलंदाजी करू शकतो आणि मधल्या फळीत असो किंवा खाली फलंदाजीही करू शकतो. आम्ही जेव्हाही शिवमला गोलंदाजीसाठी चेंडू हातात देऊ तो संघासाठी गोलंदाजी करेल. संघात चार अष्टपैलूही आहेत, जे संघासाठी अप्रतिम कामगिरी करतील, असा विश्वास रोहितने व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेत के. एल. राहुलचा फॉर्म आणि अन्य फलंदाजांची दमदार कामगिरी पाहाता त्याला संघाबाहेर ठेवण्याचा पर्याय आमच्याकडे उरल्याची माहिती आगरकरने दिली. संघात त्याचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे राहुलला वगळण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे समोर आले.

रिंकू आणि शुबमन अनलकी

संघ निवडीत सर्वात कठीण गोष्ट रिंकू सिंहला संघाबाहेर ठेवणे ही होती. रिंकूने काहीही चुकीचं केलं नव्हतं. ना शुबमन गिलचेही काही चुकलं नव्हतं. रिंकूऐवजी आम्हाला आणखी एका गोलंदाजाची गरज अधिक वाटली. अमेरिकेत कशी स्थिती असेल याची आम्ही आताच कल्पना करू शकत नाही. रिंकू केवळ अनलकी आहे. तसेच शुबमन गिलही चांगला फॉर्मात आहे, पण सलामीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे आम्ही त्यालाही संघात स्थान देऊ शकलो नसल्याचे आगरकरने सांगितले. रिंकूला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेणे आमच्यासाठी नक्कीच सोप्पा नसल्याचेही आगरकरने सांगितले.

कोहलीच्या स्ट्राईक रेटपेक्षा फॉर्म महत्त्वाचा

कोहली हा हिंदुस्थानचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि तो सध्या जबरदस्त फॉर्मातही आहे. त्याच्या धावा करणे हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. जर आम्ही 220 धावांचा पाठलाग करणार असू तर आमच्याकडे त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी त्या स्ट्राईक रेटने खेळणारे फलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही कोहलीच्या स्ट्राईक रेटचा कधीही विचार केलेला नाही. तुम्ही त्याच्या आयपीएल फॉर्मवर लक्ष ठेवा. वर्ल्ड कपसारख्या मोठय़ा स्पर्धेत वेगळा दबाव असतो. इथे अनुभव महत्त्वाचा असतो, असे सांगत रोहित विराटच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

ऑफस्पिनर म्हणून पटेलच पटला

ऑफस्पिनरबाबतही खूप चर्चा झाली. वॉशिंग्टन सुंदर गेले काही दिवस फार खेळलेला नाही. त्यामुळे अश्विन आणि अक्षरमध्येच चुरस होती. अश्विन सध्या या फॉरमॅटमध्ये फार काही करत नाही आणि दुसरीकडे अक्षर पटेल चांगल्या फॉर्मात आहे. वन डे वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे अश्विनपेक्षा अक्षरच सरस असल्याचे मत रोहितच आगरकरनेही मांडले आणि त्याच्या निवडीचे समर्थन केले.

हार्दिक पंडय़ाला कर्णधार पदावरून का हटवलं…

रोहित शर्माने वन डे वर्ल्ड कपमध्ये जोरदार नेतृत्व केले होते. आगामी टी-20 वर्ल्ड कप हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. त्यामुळे त्याचा पर्याय शोधला जात होता. म्हणून हार्दिक पंडय़ाकडे संघाचे टी-20 चे कर्णधारपद सोपविण्यात आले असल्याचे अजित आगरकरने सांगितले. आम्ही हार्दिकलाही ओळखतो, पण रोहित हा एक महान खेळाडू आहे. याच कारणास्तव त्याला टी-20 चे नेतृत्व सोपविण्यात आल्याची सारवासारव आगरकरने केली. मात्र रोहितने आपल्यासाठी कर्णधारपद असणे-नसणे महत्त्वाचे राहिलेले नसल्याचे सांगितले.