रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? सलामीवीर आणि मधल्या फळीचा पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याची हिंदुस्थानी कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. यामुळे त्याचे सिडनी येथील तिसऱया कसोटीतील हिंदुस्थानी संघातील स्थान निश्चित झाले. पण एक प्रश्न अद्याप सुटलेला नाहीए. रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, या प्रश्नाचे उत्तर संघ व्यवस्थापनाला लवकरात लवकर सोडवावे लागणार आहे. त्यांच्यासमोर सलामी आणि मधली फळी असे दोन पर्याय आहेत.

मायदेशात घवघवीत यश

रोहित शर्माने मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने आतापर्यंत झळकावलेली सहाही शतके ही मायदेशात केलेली आहेत. याशिवाय आशिया वगळता त्याला परदेशात सलामी फलंदाजाचा अनुभव नाहीए. त्यामुळे तो चेंडू उसळणाऱया, स्विंग होणाऱया खेळपट्टीवर सलामी फलंदाज म्हणून कशी कामगिरी करील याबाबत साशंकता आहे. यामुळे तो मयांक अग्रवाल या सलामीवीराच्याऐवजी संघात येईल की मधल्या फळीतील हनुमा विहारीऐवजी त्याला संघात घेतले जाईल हे आताच सांगता येणार नाही.

सलामी फलंदाज म्हणून ठसा

रोहित शर्माने 2019 सालामध्ये सलामी फलंदाज म्हणून शानदार कामगिरी केली. त्याने मायदेशात झालेल्या तीन कसोटींत 529 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये तीन शतकांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियात मात्र त्याला अपयशाचा चेहरा पाहावा लागला आहे. तेथील पाच कसोटींमध्ये त्याला फक्त 279 धावाच करता आल्या आहेत. यामध्ये नाबाद 63 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये अपयशी

रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक यश संपादन केले आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आपला ठसा उमटवता आलेला नाही. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या महत्त्वाच्या देशांमध्ये कसोटी खेळताना त्याला निराशेचा सामना करावा लागला आहे. या देशांमध्ये त्याने कसोटी क्रिकेट खेळलेल्या 24 डावांमध्ये फक्त तीनच अर्धशतके झळकावता आलेली आहेत.

रोहित शर्माची कसोटीतील कामगिरी

32 कसोटी – 2141 धावा – 6 शतके – 10 अर्धशतके

मायदेशातील कामगिरी

14 कसोटी – 1325 धावा – 6 शतके – 5 अर्धशतके

परदेशातील कामगिरी

18 कसोटी – 816 धावा – 0 शतके – 5 अर्धशतके