
इंग्लंडविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱया एकमेव आणि निर्णायक कसोटी क्रिकेट सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. कोरोनाचे संक्रमण झाल्याने रोहित सध्या विलगीकरणात आहे. रोहितच्या गैरहजेरीत जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता आहे.
कोरोना झालेल्या रोहितच्या क्वारंटानचा कालावधी हा बुधवारी संपणार होता आणि त्यानंतर त्याची कोरोना चाचणी होणार होती. चाचणी निगेटिव्ह आल्यावर तो हिंदुस्थानी संघात दाखल होईल आणि पहिला कसोटी सामना खेळेल असे सर्वांनाच वाटत होते, मात्र रोहित हा पाचव्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
कोहलीऐवजी बुमराह होणार कर्णधार?
टीम इंडियामध्ये रोहित शर्मानंतर विराट कोहली हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे रोहितच्या गैरहजेरीत माजी कर्णधार असलेल्या कोहलीकडे कर्णधारपद देण्यात येईल असे वाटत होते, मात्र निवड समितीने कोहलीचा विचार न करता बुमराहला कर्णधार केल्याचे म्हटले जात आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा बीसीसीआयने केलेली नाही.






























































