रोखठोक – बंगळुरात घडले, दिल्लीत बिघडले! दिलदार ‘इंडिया’चे नवे रोपटे

बंगळुरातइंडियाआघाडीची स्थापना होताच मोदीशहा यांनी दिल्लीतएनडीएचा जीर्णोद्धार केला. हेचइंडियाआघाडीचे यश. देशातील लोकशाही रोज मारली जात आहे. ईडी, सीबीआय, ईव्हीएम ही शस्त्रे देशातील जनतेला गुलामगिरीकडे ढकलत आहेत. राजकारणात मन मोठे असावे लागते. ती दिलदारी संपलीच होती. बंगळुरात त्या दिलदारीचे नवे रोपटे उगवताना दिसले.

काँग्रेसची मजबूत सत्ता असलेल्या कर्नाटकची राजधानी बंगळुरात देशातील 26 प्रमुख पक्षांचे एक संमेलन पार पडले. देशात 2024 साली लोकशाहीवाल्यांचे राज्य व्हावे, धर्मांधता व हुकूमशाहीचे राज्य नष्ट व्हावे यासाठी हे सगळे एकत्र आले व त्यांचे एकत्र येणे यशस्वी झाले. कारण त्याच दिवशी आपले प्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विस्कटलेल्या ‘रालोआ’ म्हणजे ‘एनडीए’ची जमवाजमव करून दिल्लीत बैठक घ्यावी लागली. हे बंगळुरू बैठकीचे यश म्हणावे लागेल. बंगळुरूसाठी विमानतळावर निघताना मुंबईतील एका हाटेलात राष्ट्रवादीतून भाजपात सामील झालेल्या नेत्याची भेट अचानक झाली. ते ‘एनडीए’ बैठकीसाठी दिल्लीत निघाले होते. मी सांगितले, “आम्ही बंगळुरात निघालोय.” यावर त्यांचा प्रश्न, “तेथे जाऊन आता काय साध्य होणार?”

“काय होणार? ते शेवटी जनताच ठरवेल. मोदी ज्यांना स्वत:चे वैयक्तिक शत्रू समजतात त्या सगळय़ा देशभक्त पक्षांचे ऐक्य व्हावे, त्यांचे नेते एकत्र राहावेत अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केला आहात,” असे मी म्हटले. त्यावर ते म्हणाले, “विरोधी पक्षांचे ऐक्य आता कशासाठी?”

“मोदी-शहांचा पराभव करण्यासाठी!”

“मोदीचा पराभव का करायचा?” प्रश्न.

“देशातील हुकूमशाही संपवून लोकशाही टिकविण्यासाठी. आज सत्तेचे, संपत्तीचे विकेंद्रीकरण पूर्णपणे संपले आहे. सत्ता व संपत्ती फक्त दोन-चार लोकांच्याच हाती एकवटली आहे. हे चित्र तुम्हाला पटते काय?” माझा प्रश्न.

“चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचे नाही… त्यामुळे मोदी हवेत.” असे ते म्हणाले.

“2024 ला मोदी जातील. तेव्हा काय कराल?”

“ते खरेच जातील काय?”

“जातील हे नक्की!” मी ठामपणे सांगितले. त्यांच्या मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.

आम्हीच जिंकणार!

बंगळुरात 26 राजकीय पक्षांची बैठक झाली ती 18 तारखेस. त्याच दिवशी दिल्लीतील अशोक हाटेलात ‘एनडीए’ म्हणून 36 पक्षांचे संमेलन भाजपने घेतले व मोदींनी त्यात नेहमीप्रमाणे, नेहमीच्याच पठडीतील भाषण केले. “2024 सालीही आम्हीच जिंकणार. आम्हालाच मत देण्याचे लोकांनी ठरवले आहे,” असे मोदी म्हणतात. आम्हीच जिंकणार व आम्हीच दोन-चार लोक सत्ता राबवणार. हे सर्व ऐकले तेव्हा वाटले, भारतीय राजकारण हे आता मतदारांवर अवलंबून नाही. ते फक्त मोदी, शहा, ईडी, सीबीआय, उद्योगपती अदानी व अंबानी ठरवतात. त्यासाठी तंत्र, मंत्र, धर्म सर्व वापरले जाते. जे राघोबादादांनी त्या काळात केले. थोरले माधवराव पेशवे यांना मृत्यू यावा म्हणून राघोबांनी अघोरी उपाय केले, तर आनंदीबाई जप-जाप करीत होत्या. गुवाहाटी-छाप राजकारण महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनासाठी दिल्लीने घडवले ते याच माध्यमातून. लोकशाही म्हणजे मी, माझ्या ‘टोळी’साठी चालवलेले राज्य असे चित्र निर्माण झाले आहे. बुद्धिवाद, वैचारिक भूमिका, स्वच्छ राजकारण हे सर्व विषय सामान्य जनतेच्या करमणुकीसाठी ठेवलेले दिसतात.

जग अजिबात बदलले नाही. कारण ज्यांच्यावर ते बदलायची जबाबदारी तेच बदलत नाहीत, पण शेवटी हा गोंधळ आणखी किती दिवस चालणार? हाच प्रश्न आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन यांनी आपल्या टेबलावर एक पाटी ठेवली होती.

‘ultimate responsibility lies here’ असे त्यावर लिहिलेले होते. सध्याची देशातील अस्थिर स्थिती, तपास यंत्रणांच्या जोरावर फोडले जाणारे पक्ष, राजकीय विरोधकांना तुरुंगाची भीती व त्यातून पाडली जाणारी सरकारे, देश संकटात असतानाही न थांबलेले भ्रष्टाचार, धर्मांधता, नेत्यांतील संघर्ष हे सर्व पाहून जबाबदारी या शब्दाचाच मृत्यू झाला असे वाटू लागते.

जीर्णोद्धार का?

बंगळुरातील जमलेल्या सर्व राजकीय पक्षांचे वातावरण खेळीमेळीचे होते. बंगळुरूच्या विमानतळावर खासगी विमानांचे पार्किंग त्या दिवशी पाहण्यासारखे होते. 17 तारखेच्या संध्याकाळी श्रीमती सोनिया गांधी यांनी सर्व निमंत्रितांसाठी जेवण ठेवले व संपूर्ण ‘भारत’ त्या रात्री एका टेबलावर स्नेहभोजनास जमलेला दिसला. फक्त मोदी किंवा भाजप म्हणजे भारत नाही हे त्या रात्री स्पष्ट झाले. बहुधा त्यामुळे दुसऱया दिवशी आघाडीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले असावे. हुकूमशाहीविरुद्ध ‘इंडिया’ एकवटल्याचे ते चित्र प्रेरणादायी होते. बंगळुरात ‘इंडिया’ एकत्र आले म्हणून दिल्लीत भाजपने ‘एनडीए’ गोळा केले. त्यात 38 पक्ष होते. त्यातील 26 पक्षांचे त्या त्या राज्यातही अस्तित्व नव्हते. काही पक्ष तर तालुका स्तरावरच होते. महाराष्ट्रातून विनय कोरे, बच्चू कडू, गोव्यातून सरदेसाई हे त्या 38 मध्ये होते. या 26 पक्षांचा एकही खासदार नाही, पण 38 पक्षांचा नवा एनडीए निर्माण करून श्री. मोदी ऐट दाखवत आहेत ती व्यर्थ आहे. मोदी एकटे सगळय़ांवर भारी! असे स्वत: अनेकदा मोदी यांनी छाती ठोकीत सांगितले, पण त्यांनाही शेवटी 2024 साठी ‘एनडीए’चा जीर्णोद्धार करावा लागला.

देशाचा लढा!

दिल्लीत मोदी व बंगळुरात राहुल गांधी असे त्या बैठकीचे चित्र, पण दिल्लीच्या बैठकीत सर्व गुलाम किंवा परप्रकाशी पक्ष होते. बंगळुरात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बानर्जी, उद्धव ठाकरे, केजरीवाल, नितीश कुमार, हेमंत सोरेन, शरद पवारांपासून पंजाबचे भगवंत मान, लालू यादव, अखिलेश यादव, सीताराम येचुरीपर्यंत सर्व लढाऊ नेते होते. लढणाऱयांच्या मागे शेवटी जनता उभी राहते. ‘इंडिया’ नाव ठेवले म्हणून टीका करणाऱयांना राहुल गांधी यांनी बंगळुरात उत्तर दिले. हा लढा देशासाठी म्हणूनच ‘इंडिया’ हे नाव. ते योग्यच आहे. आम्हीच जिंकू व जनता आम्हालाच मत देईल, असे सांगणाऱयांचा अहंकार फार काळ टिकणार नाही हे बंगळुरातील हवेने स्पष्ट केले. बंगळुरात सर्वच नेत्यांचे दिलदारीने स्वागत करण्यात काँग्रेसने पुढाकार घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे जातीने उपस्थित होते.

देशाच्या राजकारणातून 2014 पासून दिलदारीचे पूर्ण उच्चाटन झाले. त्या दिलदार इंडियाचे नवे रोपटे पुन्हा बंगळुरूच्या भूमीत लागले.

2024 पर्यंत त्याचा महावृक्ष होवो!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]